तहसीलदारांचे स्वस्त धान्य दुकानदारांना पाठबळ! शासनाच्या योजनेतून गरिबांची लूट! स्वाभिमानी म्हणते आंदोलन करू..

 
yuuy
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तहसीलदार स्वस्त धान्य दुकानदारांना पाठबळ देत असल्याने, गोरगरीब लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. अशा दुकानदारांवर त्वरित कारवाई न झाल्यास तहसीलदारांची खुर्ची ताब्यात घेऊन स्वभिमानी शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करेल असा इशारा आज एका निवेदनातून देण्यात आला. 

बुलडाणा तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकाने असून शासनाच्या योजनेतून अंतोदय,अन्नसुरक्षा बीपीएल, एपील पंतप्रधान योजने अंतर्गत धान्य मिळते परंतु हे स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्याचे ठसे दोनदोनदा घेवून माहित नसलेल्या योजनेची लुट करून लाभार्थ्याला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. आणि यामध्ये तहसीलदार,पुरवठा निरीक्षक, डिएसओ यांच्या संगनमताने स्वस्त धान्य दुकानदाराकडून हप्ते घेवून गोरगरिबाची लुट होत आहे आणि यामुळे अनेक नागरिकांना बाहेरून ४० रु किलोचे गहू विकत घ्यावे लागते. एक तर ज्यांच्या नावावर एक एकर शेती सुद्धा नाही त्यांना मिळणारे एक हजार अनुदान सुद्धा शासनाने बंद केले आहे.

शेत मालाचे भाव पडलेले आहे आणि अश्याप्रकारे जे धान्य सरकार कडून मिळते ते सुद्धा यांच्या भ्रष्टाचारामुळे बंद होत असेल तर सामान्य माणसाने जगायचे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कडक कार्यवाही करावी, अन्यथा स्वाभिमानी च्या वतीने  तहसीलदार आणि संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या विरोधात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी रफिक शेख,अमोल मोरे,महेंद्र जाधव, गजानन देशमुख, सांडू बोरखडे, भगवान बोरखडे, शिवाजी सुसर उपस्थित होते.