सोयाबीन-कापूस प्रश्नी, सरकारने रविकांत तुपकरांशी चर्चा करावी! अजित पवारांनी घेतली जलसमाधी आंदोलनाची दखल; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका

 
pawar
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतकरी नेते रविकांत तुपकर हे हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान या आंदोलनाची राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी गंभीर दखल घेतली असून रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मांडलेल्या मागण्या रास्त आहेत, चर्चेतून समस्या सुटतात त्यामुळे राज्य सरकारने तुपकरांना चर्चेसाठी बोलावले पाहिजे. शेतकऱ्यांचा आवाज शासनाने ऐकला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मी यासंदर्भात पत्र दिले आहे अशीही माहिती अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पवारांनी सांगितले रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत. सोयाबीनला ८७०० आणि कापसाला १२५०० भाव मिळावा यासाठी केंद्राने सरकारने आयात निर्यातीचे धोरण ठरवावे, डिओसी आयात करू नये, याशिवाय शेतकऱ्यांच्या इतरही मागण्या त्यांनी मांडला आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत. मुंबई येथे समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. मुळात जलसमाधी सारखे आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी शासनाने आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे आवश्यक असते, आमच्या काळात जेव्हा आंदोलन झाले तेव्हा आम्ही आंदोलकांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी तुपकरांना चर्चेसाठी बोलवावे असे पत्र आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले असल्याचे देखील पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान थेट अजितदादा पवार यांनी रविकांत तुपकर यांच्या जलसमाधी आंदोलनाची दखल घेतल्याने शेतकऱ्यांची ही फौज मुंबईत पोहोचण्यापूर्वीच या आंदोलनाचा धाक आणि दरारा मुंबईत पोहोचल्याचे यावरून दिसून येत आहे.
 रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात दोनशे ते अडीचशे वाहनांचा ताफा व हजारो शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे निघाली असून ठिक ठिकाणी या यात्रेचे शेतकरी स्वागत करत असून वाहने घेऊन या यात्रेत सहभागी होत आहेत. भोकरदनच्या पुढे ही फौज पोहोचली आहे.