सोयाबीन कापसाचे आंदोलन पेटले; जलसमाधी घ्यायला तुपकर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईकडे रवाना; मुंबई पोलिसांची नोटीस धडकली! तुपकर म्हणाले, आडवा आडवी केल्यास रक्ताचे पाट वाहतील...!

 
jhh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायचा इशारा दिला आहे. उद्या,२४ नोव्हेंबरला मुंबईत सकाळी १० वाजता ते जलसमाधी घेणार आहेत. दरम्यान आज, २३ नोव्हेंबरला तुपकर हजारो शेतकऱ्यांसह बुलडाण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.  आता माघार घेणार नाही. हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा आहे. सरकारला आमचे मुडदे हवे असतील तर आम्ही शहीद व्हायला तयार आहे. पोलीसांनो आता आम्हाला अडवू नका. अडवा आडवी केल्यास रक्ताचे पाट वाहतील असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ तर कापसाला साडेबारा हजार रुपयांचा भाव मिळाला पाहिजे. यासाठी सोयापेंड निर्यातीला सरकारने प्रोत्साहन द्यावे,सोयापेंड आयात करू नये. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी तुपकरांनी आंदोलन पुकारले आहे. याच मागण्यांसाठी ६ नोव्हेंबरला बुलडाण्यात रेकॉर्डब्रेक गर्दीचा एल्गार मोर्चा निघाला होता.

मात्र त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्याने तुपकरांनी आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात जलसमाधी आंदोलनाची घोषणा केली.  पोलिसांनी तुपकरांना याबाबत नोटीस बजावली होती मात्र कितीही नोटीस आल्या तरी थांबणार नाही असे तूपकरांनी म्हटले होते. दरम्यान आज, २३ नोव्हेंबरला सकाळपासून हजारो शेतकरी बुलडाण्यात दाखल होत होते. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर समोर आंदोलक शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्याने पोलीसांना वाहतूक  पर्यायी मार्गाने वळवावी लागली.  दरम्यान हजारो शेतकरी आज तुपकरांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे रवाना झाले असून उद्याच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागून आहे.