धक्कादायक...! फ्लॉवर-फायरच्या नादात तरुणांकडे वाढताहेत शस्‍त्रास्‍त्रे!!; तीन महिन्यांत ९ गुन्हे दाखल

 
54
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : फ्लॉवर नहीं फायर हैं मै... हा पुष्पा चित्रपटातील डायलॉग चांगलाच गाजला. तो डायलॉग अनेकांचा अगदी तोंडपाठ झाला. मात्र केवळ डायलॉग पाठ करण्यापुरती थांबतील ती युवा पिढी कसली? त्‍यांनी स्वतःला फायर सिद्ध करण्यासाठी शस्त्र बाळगण्याचा अट्टहास चालवला आहे. मात्र हा अट्टहास कायद्याच्या कचाट्यात अडकवणारा असल्याचे भान त्‍यांना नाही. २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांतच जिल्ह्यात आर्म ॲक्टचे ९ गुन्हे दाखल झाले आहेत. चालू एप्रिल महिन्यात आतापर्यंत ५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्‍यामुळे युवा पिढीने असा आयुष्य खराब करणारा अट्टहास सोडलेलाच बरा..!

देशी कट्टा, तलवार, खंजीर, फायटरसारखे शस्त्र सोबत बाळगणाऱ्यांची संख्या बुलडाणा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्हा पोलीस दल कारवाया करून शस्त्र जप्त करत असले तरी या कारवायांवरून जिल्ह्यात गुन्हेगारीची मानसिकता वाढून शस्त्र बाळगण्याचा नवा ट्रेंड तर तयार होत नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

जिल्हा पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवायांतील गुन्ह्यांचा विचार केला असता शस्त्र बाळगण्याची ही क्रेझ २० ते ३० या वयोगटातील तरुणांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नवतरुणांची गुन्हेगारीकडे होत असलेली वाटचाल पोलीस प्रशासनासोबतच समाजासाठी सुद्धा चिंतेचा विषय ठरत आहे.

शस्त्रे येतात तरी कुठून?
विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील काही ठराविक भागात अवैध शस्त्रविक्रीचा व्यवसाय चालतो. यात देशी कट्टा आणि तलवारीचा समावेश आहे. विशेष म्हणजे देशी कट्टा ३० ते ३५ हजार रुपयांत मिळत असल्याची माहिती आहे. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवायांवरून ही शस्त्रे संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावातून येत असल्याचे समोर आले आहे. खंडणी वसूल करण्यासाठी, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तरुण शस्त्र खरेदीकडे वळत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.