धक्कादायक! अन् चक्क मयत झालेले शेतकरी पोहचले तहसीलदाराच्या दरबारात! चिखलीच्या तहसील कार्यालयात उडाला गोंधळ! वाचा काय आहे नेमका प्रकार...

 
iuggu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बातमीचे हेडिंग वाचून  वाचकांना आश्चर्य वाटने स्वाभाविक आहे.. देवाघरी गेलेले शेतकरी तहसील कार्यालयात कसे जातील असे आपल्याला वाटू शकते..हा काही भुताटकीचा तर प्रकार नाही ना असेही वाटल्यास नवल नाही..मात्र हा भलता - सलता काही प्रकार नसून सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा परिणाम आहे. चिखली तालुक्यातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अनुदानापासून वंचित राहिले. शेतकऱ्यांनी जेव्हा या कारणांचा शोध घेतला तेव्हा तर अक्षरशः शेतकरीही हादरले. शेतकरी जिवंत असताना शासनाच्या दरबारी मात्र अनेक शेतकऱ्यांना मयत दाखवण्यात आले,परिणामी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी "त्या" शेतकऱ्यांना मिळाला नाही. अखेर शेतकऱ्यांनी ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या कानावर घातली. सरनाईक यांनी शासनदरबारी मयत मात्र प्रत्यक्षात जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना घेऊन तहसीलदारांचे कार्यालय गाठले. जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना मयत दाखवण्यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान द्या अन्यथा स्वाभिमानी स्टाईल आंदोलन करू असा इशारा यावेळी सरनाईक यांनी दिला आहे.

  सर्वच पातळ्यांवर प्रशासन ढेपाळले आहे.कामे होत नाहीत आणि योजना राबवल्या जात नाहीत. यात शेवटी भरडला जातोय तो सामान्य माणूसच. त्याच्या वेदनांचे मात्र कुणालाच सोयर-सुतक उरलेले नाही. एखादी योजना कार्यान्वित केली तर त्यातही भयंकर परिणाम समोर येतात. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू झाली. मात्र या योजनेत शेतकऱ्यांना जिवंत असताना देखील मयत दाखविण्यात आल्याने रोष व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजना सुरू केली. ४ महिन्याला २ हजार याप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये मदत दिली जाते. त्यानुसार सगळ्या खातेदारांचे सात बारा, खाते आणि बॅक खाते जोडले आहे. मात्र त्यात, काही लाभार्थ्यांच्या खात्याचे ई-केवायसी झालेली नाही,ही बाब समजण्यासारखी असली तरी कृषी विभाग आणि महसूल खात्याच्या श्रेय वादात अडकलेल्या योजनेत अनेक शेतकऱ्यांना जिवंत असताना मयत दाखविण्यात आले आहे. हा प्रकार दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. चिखली तालुक्यातील शेलोडी येथील अरुण बापू नेमाने, मनोहर नारायण वाळस्कर, मधुकर दौलत नेमाने तर अंबाशी येथील वसंता पुंडलिक वाडेकर यासह अनेक शेतकरी जिवंत असताना मयत दाखविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत हाच प्रकार घडला आहे. 

तहसीलदारांना निवेदन..

 दरम्यान आज,१८ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी शासनाच्या दरबारी मयत असलेल्या शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालय गाठले. यावेळी सरनाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ तणाव वाढला होता. जिवंत शेतकऱ्यांना मयत दाखवताना अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, या प्रकारात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, वंचित शेतकऱ्यांना तातडीने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी द्या,अन्यथा स्वाभिमानी स्टाईल आंदोलन करू असे सरनाईक यावेळी म्हणाले.