धक्कादायक! बुलडाण्यात ३१६ शेतकरी आत्महत्या! प्रत्यक्षात केवळ ७९ प्रकरणात शासकीय मदत

 
hyfggh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 'समजू नको ढगा तू, साधे-सुदे बियाणे! पेरले मी पिल्लांच्या चोची मधील दाणे!' या काव्यओळीप्रमाणे शेतकरी पेरणी करतात. परंतु अस्मानी, सुलतानी संकटामुळे नापीकी व कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांना टोकाचे पाउल उचलण्यासाठी मजबूर करीत असल्याचे दाहक वास्तव अस्वस्थ करणारे आहे. कारण डिसेंबर अखेर ३१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळले आहे. त्यापैकी ८३ शेतकऱ्यांचे वारस शासकीय मदतीस पात्र ठरले तर १६१ अपात्र ठरले. ७२ प्रकरण चौकशीवर असून, प्रत्यक्षात ७९ प्रकरणात शासकीय मदत मिळाली आहे.

पावसाच्या अनिमतपणामुळे व अतिवृष्टीमुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पादन झाले नाही. पिके काढणीवर येताच निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेती डबघाईला येत असल्याने, मेटाकुटीस आलेले शेतकरी टोकाची भूमिका घेत आहेत.शेतकरी स्वतःचे सरण रचून स्वतःला संपवीत आहेत. आत्महत्येचे मूळ सबसिडीमध्ये नाही, कर्जमाफी वा वीजबिलमाफीने त्या थांबणार नाहीत. शेळ्या, बोकड देऊनही उपयोग नाही. कारण शेतकरी बी आत्महत्येचे मूळ शेतीमालाच्या भावात दडलेले आहे. आजवरच्या सर्वच सरकारांनी शेतीमालाला भाव मिळू नये, अशीच व्यवस्था केली. त्यामुळे आत्महत्या वाढत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.

आत्महत्यांवर दृष्टिक्षेप

२०२२ या वर्षातील डिसेंबर अखेर ३१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक ३२ आत्महत्या ऑगस्ट महिन्यात झाल्या. जानेवारीत २८, फेब्रुवारी २३, मार्च २१,  एप्रिल २७, मे २८, जून २५,जुलै २२, ऑगस्ट ३२, सप्टेंबर २७, ऑक्टोबर २९, नोव्हेंबर २५, डिसेंबर २९ अशा एकूण ३१६ शेतकरी आत्महत्या झाल्या.त्यापैकी ८३ शेतकऱ्यांचे वारस शासकीय मदतीस पात्र ठरले तर १६१ अपात्र ठरले. ७२ प्रकरणी चौकशीवर असून, प्रत्यक्षात ७९ प्रकरणात शासकीय मदत मिळाली आहे.