पाण्यावरून शिमगा..! कोलवडमध्ये ढिश्यूम ढिश्यूम, कुऱ्हाडही चालली...

 
786
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उन्हाच्या झळांबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा ग्रामस्‍थांना सोसाव्या लागत आहेत. यातून गावागावात वादही वाढले आहेत. बुलडाणा तालुक्‍यातील कोलवडमध्ये एका कुटुंबावरच हल्ला चढविण्यात आला. यात एक जण जखमी झाला. ही घटना २३ एप्रिलला सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. बुलडाणा शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाजीराव श्रीधर जाधव, सुनिल श्रीधर जाधव, विलास श्रीधर जाधव, अजय बाजीराव जाधव (सर्व रा. कोलवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राहुल केशव जाधव (३०, रा. कोलवड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. दोन्ही कुटुंब जवळ जवळ राहतात. २३ एप्रिलला सकाळी गावात नळ आले. राहुल जाधव याने नळावरून पाणी भरले.

त्यानंतर घरासमोर पाणी शिंपडत असताना बाजीराव जाधव तिथे आला व म्‍हणाला, की  तुझा नळ बंद कर. तुझा नळ सुरू असल्याने आमच्या नळाला कमी पाणी येत आहे. राहुलने दोन मिनिटांत बंद करतो असे सांगितले. मात्र आताच कर असे म्‍हणून बाजीराव जाधवने शिविगाळ केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यानंतर वाद वाढून बाजीरावसह सुनिल, विलास, अजयने कुऱ्हाड, काठ्यांसह राहुलवर हल्ला चढवला.

त्‍याला वाचवायला धावलेल्या त्‍याची पत्नी सौ. पूजा व आई नर्मदा यांनाही लोटपाट करून जीवे मारण्याची धमकी दिली. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात जखमी झाल्याने राहुलने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. त्‍यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास मपोहेकाँ कोकीळा तोमर करत आहेत.