बुलडाणा लाइव्हचा द्वितीय वर्धापन दिन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात ! श्रमदान करून मान्यवरांच्या हस्ते होणार विशेषांकाचे विमोचन; मार्गदर्शनासाठी सोमवारी अंचरवाडीत एकवटणार मान्यवर..

 
live
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   बुलडाणा  लाइव्ह म्हणजे  पावणेदोन लाख   वाचकांचे  हक्काचे व्यसपीठ!   अवघ्या २ वर्षात मोठा  पल्ला गाठून प्रगतीची शिखरे गाठणाऱ्या 'बुलडाणा लाइव्ह' ने आपल्या चौफेर वृत्तसेवेला पदार्पणापासूनच सामाजिक बांधिलकी जोपासली अन जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांप्रती कायम आदरभाव जपला  .  यंदाचा द्वितीय वर्धापन दिन देखील या उज्ज्वल परंपरेला अपवाद नाहीये!  

येत्या ६ जूनला सकाळी ९ वाजता   चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शनासह आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना पेरणीच्या तोंडावर बी- बियाणे, खते  भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. शेतकरी पुत्र असणारे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे 'खरिपाच सपान'  या  अंकाचे विमोचन करणार आहे.  खाकी मध्येही मानवी संवेदना जोपासणारे  पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया या अनोख्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्नांवर आंदोलन उभारणारे "स्वाभिमानी" कार रविकांत तुपकर, शेतकरी समस्यांचे अभ्यासक असणारे निवासी उप जिल्हाधिकारी दिनेश गीते,   बुलडाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. विजय सावळे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक, चिखलीचे  प्रभारी तहसीलदार वैभव खाडे , चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीष गुप्त, अंचरवाडीच्या सरपंच कोकिळाताई परिहार  आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. 

बळीराजा भिऊ नकोस सर्व समाजघटक तुझ्या पाठीशी हाय!

वर्धापन दिन म्हणजे भपकेबाज  समारंभ,  दिखाऊ बडेजाव, शो- बाजीचे प्रदर्शन असा माहौल असतो. मात्र याला फाटा देत शेतकरी केंद्रस्थानी मानणाऱ्या बुलडाणा लाइव्ह ने यंदाचा विशेषांक शेतकऱ्यांनाच समर्पित केला आहे. कृषिप्रधान  ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंचरवाडी  मधील शेत शिवारात आयोजन, शेतकऱ्यांची भरगच्च हजेरी, दूरपर्यंत दिसणारी शेती, शेतकऱ्यांप्रती आदरभाव जोपासणारे मान्यवर अतिथी, त्यांच्याकडून मिळणारे मोलाचे मार्गदर्शन ही कार्यक्रमाची वैशिट्ये ठरणार आहे. यावर कळस म्हणजे शासन, प्रसाशन, पोलीस, वकील हे सर्व शेतकऱ्यांचा पाठीशी आहेत, त्यांच्या सुखदुःखात सहभागी आहे ही ग्वाही देण्याचा बुलडाणा लाइव्ह चा प्रयत्न आहे. यामुळे ६ जून रोजीचा हा अनोखा सोहळा अभूतपूर्व व अविस्मरणीय ठरणार आहे. सकाळी ९ते ११ दरम्यानचे २ तास शेतकऱ्यांना दिलासा, धीर, हम साथ साथ है हा संदेश देणारे ठरणार आहे...