SUCCESS STORY चिखली तालुक्यातील अंचरवाडीचा अमोल होणार उपजिल्हाधिकारी! "एमपीएससी" त राज्यात आठवा; संघर्षगाथा वाचून तुम्ही म्हणाल शाब्बास रे गड्या..

 
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील अमोल जनार्धन परिहार हा तरुण आता उपजिल्हाधिकारी होणार आहे.. काल, २९ एप्रिलला लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून आठवा क्रमांक मिळवून त्याने मोठे यश संपादन करीत आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले. आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी समर्पित प्रयत्न केले की कोणतीही गोष्ट अशक्य नाहीच हेच अमोलने दाखवून दिलेय. गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेला एका जिल्हा परिषद शिक्षक वजा शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या अमोलने मिळवलेले यश स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

पहिली ते चौथी अंचरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत त्यानंतर पाचवी ते सातवी गावातीलच श्री शिवाजी विद्यालयात अमोलचे शिक्षण झाले. वर्गात आधीपासूनच हुशार असलेला अमोल आठवी ते दहावीपर्यंत चिखलीच्या आदर्श विद्यालयात शिकला. घरासाठी आर्थिक योगदान देता यावे म्हणून इंजिनियर व्हायचे स्वप्न उराशी बाळगून औरंगाबादला अकरा बारावी आणि त्यानंतर शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे स्वप्न पुर्ण केले.

२०१२ ला इंजिनिअरिंग पुर्ण केल्यानंतर ४ वर्षे त्याने पुण्यातील एका कंपनीत नोकरी केली. आणि त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. चांगली मिळालेली नोकरी सोडल्यामुळे आर्थिक अडचणी समोर येत्या. घरात लहान भाऊ असलेल्या अतुलचे बीएसस्सी  ॲग्री चे शिक्षण नुकतेच संपले होते. तोही बँकिंग ची तयारी करीत होता. मात्र अमोलने नोकरी सोडल्याने आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी अतुलने जॉब करायला सुरुवात होती. लहाना भाऊ मोठ्या भावाला पैसे पुरवत होता.

दरम्यानच्या काळात अमोलने जिद्दीने अभ्यास केला. सण, उत्सव , दिवाळी  सर्व काही विसरून त्याने ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. घरात लग्नाचा विषय निघाल्यानंतर आधी लहान्याचे लग्न करण्याचे ठरले. लहान भाऊ अतुलच्या साखरपुडा कार्यक्रमाला सुद्धा तो उपस्थित राहू शकला नाही.  लग्नासाठी तो केवळ ३ दिवस गावात होता. याआधी दोन वेळेस त्याने राज्यसेवा परीक्षा दिली होती मात्र तेव्हा अपयश आले होते. मात्र आता तिसऱ्या प्रयत्नांत यश मिळवायचेच हे मनाशी ठरवून त्याने प्रचंड अभ्यास केला.

अभ्यासात कमालीचे सातत्य असल्याने त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि काल, लागलेल्या निकालात त्याने राज्यातून आठवा आणि डीटीए पर्वगातून पहिला क्रमांक मिळवित दणदणीत यश संपादन केले. निकाल लागल्यानंतर त्याने घरी आईवडिलांना फोन लावून कळवले तेव्हा आईवडिलांच्या डोळ्यात आंनदाश्रू होते.. हा आनंद शब्दात व्यक्त करताच येत नाही ही लहान्या भावाची प्रतिक्रिया होती. अमोलच्या गावाकडील  मित्रांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. 

गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीला गावात नसलेल्या अमोलच्या यशाने आता मात्र गावात दिवाळी साजरी होत आहे.गावखेड्यातल्या सामान्य नागरिकांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी अमोलने जवळून  अनुभवल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय सेवेत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करायचे हे त्याला चांगले माहीत आहे. राज्यसेवा परीक्षेत यश मिळाल्याने आता खऱ्या परीक्षेची ही सुरुवात आहे..या यशाचे श्रेय आई वडिलांचे आणि लहान भावाचे आहे अशी प्रतिक्रिया अमोलने दिली आहे..