रविकांत तुपकरांच्या संग्रामपूर, जळगाव जामोद दौऱ्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद! ६ नोव्हेंबरचा 'एल्गार मोर्चा' ही तर शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई - तुपकर; पातुर्डा

बु. येथे  सभा तर वरवट बकाल, जळगाव जामोद शेतकऱ्यांच्या बैठका

 
tttt
संग्रामपूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एल्गार मोर्चा म्हणजे सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र येण्याची योग्य वेळ आहे. ६ नोव्हेंबरला बुलडाण्यात होणारा 'एल्गार मोर्चा' हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा असून या मोर्चाच्या निमित्ताने बुलडाण्यातून शेतकऱ्यांच्या स्वातत्र्याच्या लढाईचा बिगुल फुंकल्या जाणाऱ्या आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात रविकांत तुपकर यांचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. रविकात तुकपर यांच्या दौऱ्याला शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला.

शेतकरी नेते रविकांत तुपकर एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाभर फिरत आहेत. २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात शेतकरी पुत्र व युवा कार्यकर्त्यांनी तसेच शेतकरी, शेतमजुरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविकांत तुपकर यांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात आले. वरवट बकाल आणि जळगाव जामोद येथील बैठकीला शेतकरी, शेतमजुर व युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरीपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बुद्रूक आणि संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रूक या गावांमध्ये झालेल्या सभा लक्षवेधी ठरल्या. या दोन्ही सभांना शेतकरी, शेतमजूर आणि युवकांची प्रचंड उपस्थिती होती. प्रचंड असा प्रतिसाद या सभांना आणि एकंदरीत संपूर्ण दौऱ्याला मिळाला. सोयाबीन - कापसाचा भाव, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई, शेतमजुरांना संरक्षण, महिला बचत गटांची कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊ आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ असा नारा रविकांत तुपकर यांनी दिला. या दौऱ्यात गावोगावी प्रचंड प्रतिसाद मिळाला, ठिकठिकाणी स्वागत करुन मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आश्वासन शेतकरी देत असल्याचे दिसून आले.

दुचाकी रॅलीने स्वागत..

रविकांत तुपकर यांचे जळगाव जामोद मध्ये आगमण होताच अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जळगाव जामोद ते गाडेगाव बुद्रुक अशी २० किलोमिटरची दुचाकी रॅली काढुन रविकांत तुपकर यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. रॅलीत सहभागी झालेले शेकडो युवक कार्यकर्ते आणि प्रचंड घोषणाबाजी पाहता एल्गार मोर्चाच्या निमित्ताने एक उर्जावर्धक वातावरण तयार झाल्याचे दिसून आले.

व्यापारी संघटनांचा पाठिंबा..

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे होणाऱ्या 'एल्गार मोर्चा'ला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यात अडत व्यापारी संघटना, हमाल संघटना आणि संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाने देखील 'एल्गार मोर्चा'ला पाठिंबा जाहीर करत शेतकरी म्हणून या लढ्यात सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले.