बुलडाण्यात रेशन दुकानदारांचे महा-धरणे! आंदोलन ठरले महा शक्तिप्रदर्शन!!

 
fgb
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांकडे  शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालसमोर  आज धरणे देण्यात आले. आंदोलनाचा एकूण थाट पाहता हे आंदोलन रेशन दुकानदारांचे महा शक्तिप्रदर्शन ठरले!

भव्य व हाऊसफुल्ल शामियाना, जिह्याभरातील पदाधिकारी, सदस्य यांची  आणि विविध पक्षीय नेत्यांची पाठिंबा दर्शक उपस्थिती, आक्रमक भाषणे असा आंदोलनाचा थाट होता. यामुळे हे आंदोलन ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेश   अंबुसकर यांचे नेतृत्व व सदस्यांची भरभक्कम एकजूट सिद्ध करणारे  ठरले. खाद्यान्न मध्ये प्रति क्विंटल ४४० रुपये कमिशन, प्रति क्विंटल मागे होणाऱ्या १ किलो धान्याच्या लॉस वर झालेला निर्णय सर्व राज्यात लागू करावा, धान्य बरोबर खाद्य तेल डाळींचा दरमहा पुरवठा करावा, रेशन दुकानातून घरगुती गॅस सिलिंडर चे वितरण ची व्यवस्था करावी, धान्यासाठी न्यूटचे पोते वापरावे, कोरोना मुळे दगावलेल्या रेशन दुकानदारांना कोरोना योद्धा घोषित करून त्यांचा परिवाराला भरपाई देण्याचे धोरण जाहीर करावे, प्रलंबित कमिशन तात्काळ द्यावे, सर्वच नागरिकांना धान्य वितरण करावे आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील बरडे, सचिव मोहन जाधव, कार्याध्यक्ष रंगराव देशमुख, प्रसिद्धी प्रमुख विश्वास पाटील, उपाध्यक्ष निलेश देशमुख, राजेश शेगोकार, विजय भालतीलक, विलास आसोलकर, विष्णुपंत आखरे, तालुकाध्यक्ष माणिक सावळे, राजीव जावळे ,विनोद देशमुख, उद्धव नागरे, निरंजन जिंतूरकर, भगवान कोकाटे, रवी महाले, रमेश धनोकार, केशव दाणे, समाधान पाटील, राधेश्याम दाताळकर, उमराव चव्हाण विनोद लांजुळकर यासह सभासद बहुसंख्येने सहभागी झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांची आक्रमक भाषणे झालीत. काँग्रेस नेते श्याम उमाळकर यांचे भाषण लक्षवेधी ठरले.

२ ऑगस्टला संसदेला सपरिवार घेराव

दरम्यान हे आंदोलन विविध टप्प्यात करण्यात येत असून ४ जुलै ला सर्व तहसील वर धरणे देण्यात आले, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अंबुसकर यांनी दिली. १८ जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर व धरणे देऊन राज्य सरकारला निवेदन देण्यात येईल. २ ऑगस्टला रामलीला मैदानावर सर्व परवाना धारक परिवारासह एकत्र येऊन संसदेला घेराव करतील असे त्यांनी सांगितले