जिजाऊ जयंतीदिनी होणार राष्ट्रमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरिन सर्व्हिसेसचे उदघाटन! सिंदखेड राजा परिसर जोडला जाणार सागरी व्यापाराशी! अभिता कंपनीचा पुढाकार

 
jijabai
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरिन सर्व्हिसेसचे मातृतीर्थनगरीत १२ जानेवारी रोजी उदघाटन होणार आहे. यामाध्यमातून सिंदखेड राजा परिसर सागरी व्यापराशी जोडला जाणार आहे. अभिता कंपनीचे संस्थापक संचालक आणि सीईओ सुनील शेळके यांच्या हस्ते हे उदघाटन होईल.

भारताला हजारो वर्षांचा समृद्ध सागरी इतिहास आहे. सागरीशक्तीचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनात नौदलाची स्थापना  केली. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन दिले. भारताचा जवळपास ९० टक्के आंतराष्ट्रीय व्यापार जलमार्गाने होतो. रस्ते वाहतुकीपेक्षा जलमार्ग वाहतूक खूप स्वस्त आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत केवळ एक पंचमांश इतका खर्च जलमार्ग वाहतुकीसाठी येतो. अनेक महत्वाची ऐतिहासिक आणि व्यापारी केंद्रे असलेली बंदरे देशात आहेत. भारताच्या साडेसात हजार किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर १२ महत्वाची मोठी बंदरे आहेत. तर सुमारे २०० छोटी बंदरे आहेत. या बंदरांवरून मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होते.  भविष्यात सीप्लेन सेवा, बंदरांवर पर्यटनास चालना देणे, लाईट हाऊसची उभारणी या माध्यमातून बंदरांचा विकास केला जाणार आहे. यासाठी केंद्र शासनाने निधीची तरतूद केली आहे. पर्यायाने या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
 
सागरी व्यापार, दळणवळण, उद्योगात रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. परंतु याबाबत प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कमी आहेत. नेमक्या या बाबींचा विचार करुन अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके यांनी मातृतीर्थ नगरीत राष्ट्रमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरिन सर्व्हिसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान १२ जानेवारी रोजी या संस्थेचे उदघाटन होत आहे. याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक संचालक राहुल डोंगरदिवे, प्रियंका नाईक  यांनी केले आहे.

अशा आहेत संधी

सागरी व्यापार, उद्योग, पर्यटन, मत्स्य व्यवसायात जहाजाद्वारे चालते. जहाजावर काम करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. जहाजाचा कॅप्टन हा प्रमुख असतो. याशिवाय इतरही खूप पदे असतात. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्यांना थर्ड ऑफिसर म्हणून संधी मिळू शकते. मरिन इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्युनिअर इंजिनिअर पदी काम करता येऊ शकते. महिलांनाही शिप डॉक्टर, रेडिओ ऑफिसर म्हणून आता जहाजावर संधी उपलब्ध झाल्या आहेत. या क्षेत्रात आव्हाने आहेत. मात्र मग आकर्षक पगार आणि ग्लॅमर सुद्धा आहे. 

विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील पहिलीच संस्था

मातृतीर्थनगरीत सुरु होणारी राष्ट्रमाता जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ मरिन सर्व्हिसेस ही विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील पहिलीच संस्था आहे. मरिन सर्व्हिसेस ही आपल्या भागासाठी नवीन संकल्पना आहे. या क्षेत्रातील रोजगाराबाबत आपल्याकडे फारशी माहिती नाही. आता या संस्थेच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी, नव्या वाटा उपलब्ध होणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळणार आहे.