रब ने बना दी जोडी... वर नाचताना भान विसरला, वधूचे दुसऱ्याच मुलाशी झालं लगीन!! मलकापूर पांग्रा येथील अजब लग्नाची गजब कथा

 
42
सिंदखेडराजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अगोदरच नवरदेव उशिरा आलेला, त्यामुळे घाईगडबडीत उरकावे लागणारे धार्मिक विधी, त्यावर कळस म्हणजे वरातीत वऱ्हाडी तर सोडाच पण वराने सुद्धा नाचत धिंगाणा घातला आणि मंडपात एन्ट्री करायला तब्बल चारेक तास लावल्याने संतापलेल्या वधू पिता माता व वधू पक्षाने मंडपातच असलेल्या एका युवकासोबत आपल्या मुलीचे लगीन लावून देत त्या बेजबाबदार वराला व वऱ्हाडीना अक्षरशः हाकलून दिले...

न भूतो न भविष्यती आणि एखाद्या सामाजिक क्रांतिकारी कादंबरीत शोभेल अशी अजब लग्नाची गजब स्टोरी सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे घडली. या अजब लग्नाला आज सहा दिवस झाले असले तरी त्यामुळे अन वधू पक्षाच्या धाडसी निर्णयाने उडालेली सामाजिक खळबळ व त्यावरून सोशल मीडियासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात होणारी खमंग चर्चा अजूनही कायम आहे. 

मजेदार तितक्याच गंभीर ट्विस्टचे  मसालेवाईक  उदाहरण आणि वधू पक्षाला आपल्या तालावर नाचविणाऱ्या मस्तवाल मंडळीचे डोळे उघडणाऱ्या या लग्नाचा घटनाक्रम देखील तितकाच मनोरंजक आणि बोधप्रद आहे. यानुसार  सिंदखेराजा तालुक्यातील कंडारी येथील अमोल दामोधर पवार चे लग्न मलकापूर पांग्रा येथील भाऊराव गवई यांची मुलगी मोनिकाशी लग्न ठरले होते. २२ एप्रिलला मलकापूर पांग्रा येथे दुपारी साडेतीन वाजताच्या मुहूर्तावर हा परिणय सोहळा ठरला होता. मात्र नवरदेवाकडील मंडळी बरीच उशिरा मलकापुरात  पोहोचली. यामुळे लग्नपूर्वीचे धार्मिक विधीलाही उशीर झाला. तसेच परण्या निघण्यास देखील उशीर झाला. मात्र तरीही संयम ठेवून अन नमते घेत वधू पक्षाने मनाचा मोठेपणा दाखविला.

वरातीत लहर अन वरासह वराड्यांचा कहर!
इथपर्यंत काहीसं ठीक होतं.  मात्र डीजे, बँडच्या धुंद तालावर अन बेधुंदीत निघालेली वरात, लग्न मोडण्यास अन वधू पक्षाचा (सं)ताप  वाढविणारा ठरला! तालावर नाचताना वऱ्हाडी मंडळी आणि नवरदेवाला धुंदीत वेळेचे भानच उरल नाय! त्यामुळे लग्न दुपारी साडेतीनचे अन लग्नमंडपात नवरदेव आठ वाजता पोहचला.

यामुळे नवरीकडील लोकांचे नवरदेवाकडील मंडळींची चांगलेच वाद झाले.. आता हे लग्न नकोच असा टोकाचा निर्णय नवरी वाल्यांनी घेतला नवरदेवाला लग्नमंडपातून हाकलून लावले. सजलेली नवरी आता कुणाशी लग्न करणार म्हणून जवळच असलेल्या दुसरबीड येथील एका नात्यातील तरुणाला बोलावण्यात आले  त्याच दिवशी अन त्याच मंडपात त्याचे लग्न मोनिकासोबत लावून देण्यात आले...