कोरोना मुळे पालकत्व गमावलेल्या जिल्ह्यातील मुलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारल्या गप्पा! म्हणाले.. मा भारती तुमच्यासोबत! पंतप्रधान वेळेवर पोहचले पण जिल्हाधिकारी पोहचलेच नाहीत..

 
rfghmj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या देशभरातील मुलांशी आज,३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला. जिल्ह्यातील मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमात सहभाग घेतला. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांना पीएम केअर्स च्या माध्यमातून विविध योजनांचे वितरण करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी वेळेवर पोहचले मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात दालनात उपस्थित  असताना सुद्धा दुसऱ्या कार्यक्रमामुळे जिल्हाधिकारी कार्यकर्माला उपस्थित राहू शकले नाहीत.

trgf

आज प्रधानमंत्री नाही तर परिवारातील सदस्य म्हणून तुमच्याशी बोलत असल्याचे यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले. ज्या वेळेची कल्पना केली नव्हती अशी वाईट वेळ कोरोनामुळे अनेक परिवारांवर आली. कोरोनामुळे अनेक परिवाराच्या आयुष्यात अंधकार आल्याचे ते म्हणाले. जे दुःख तुमच्यावर आले आहे ते शब्दांत सांगता येणार नाही. मात्र या संकटात देशातील प्रत्येक नागरिक तुमच्या सोबत आहे. कोरोनाने कधीही न विसरता येणाऱ्या जखमा दिल्या आहेत. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पूर्ण देश तुमच्यासोबत आहे..

आई वडिलांच्या प्रेमाची पूर्तता करता येऊ शकत नाही याची कल्पना मला आहे  मात्र मा भारती तूमच्यासोबत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जीवनात ज्यांनी यश संपादन केले त्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागले. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरु नका असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुस्तके आयुष्यात मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडतात. त्यामुळे पुस्तकांना तुमच्या आयुष्यातील जवळचा सहकारी बनवा असा सल्ला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. आयुष्यात निराशा असताना स्वतःवर विश्वास ठेवल्यास प्रकाशाची किरणे दिसतात असे ते म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्यलढा चा उल्लेख करताना ते म्हणाले की  अनंत अडचणी असताना क्रांतिकारकांनी पराभव स्वीकारला नाही. पराभव स्वीकारणे हा भारताचा स्वभाव नाही.  कोरोना काळात भारताने स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्यामुळे भारत जगासाठी आशेचा किरण ठरल्याचे ते म्हणाले.   संकल्पासाठी  जीवन समर्पित करण्याची तयारी ठेवा असे ते म्हणाले. परिवारातील सदस्य या नात्याने आपल्याला आशीर्वाद देत असल्याचेही यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, त्यांची संपूर्ण टीम व कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या ७ कुटुंबातील १५ मुले यावेळी उपस्थित होती. "पीएम केअर्स  फॉर चिल्ड्रन" या योजनेच्या माध्यमातून मुलांच्या भविष्यासाठी विविध योजनांचे वितरण यावेळी करण्यात आले.