पोलीस कर्मचाऱ्याचा सैनिकाच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न! डोळे मारायचा,निकर अन् बनियानवर घरापुढे फिरायचा; बुलडाणा शहरातील घटना

 
546
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकात कार्यरत असलेल्या  पोलीस कर्मचाऱ्यानेच सैनिकाच्या पत्नीवर   अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा शहरात समोर आला आहे. पीडितेचा पती सैन्य दलात असल्याने ती घरी दोन मुलांसह राहत होती. याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचारी करत होता. अखेर पीडितेचा पती सेवानिवृत्त झाल्यानंतर तिने घडला प्रकार पतीला सांगितला. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी बबनराव रुस्तमराव संगाळे (५४, रा. बुलडाणा) याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बुलडाणा शहरातील पीडित ४२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे पती २६ वर्षांपासून सैन्यदलात नोकरीला होते. त्यामुळे ती दोन मुलांसह घरी एकटीच राहत होती. त्यावेळी तिच्या शेजारी राहत असलेला संशयित पोलीस कर्मचारी बबनराव हा अश्लील चाळे करुन तिला त्रास देत होता.  २०१८ ते २५ एप्रिल २०२२ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तक्रारीत म्हटले आहे. तो पीडितेच्या घरासमोरून निकर व बनियान घालून चकरा मारत होता.

तिच्याकडे पाहून डोळे मारत होता, असेही तक्रारीत म्हटले आहे. २०१८ मध्ये त्याने  पीडितेच्या घरात घुसून तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने कसेबसे त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवले होते. हा प्रकार  पीडितेने तिच्या दिराला कळवून संशयिताला  समजाविण्यास सांगितले असता त्याने दिराला जीवे मारण्याची धमकी दिली होती.  

डिसेंबर २०२० मध्येही पुन्हा दुसऱ्यांदा या पोलीस कर्मचाऱ्याने पीडितेच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २०२१ मध्ये पीडितेचे पती सेवानिवृत्तीनंतर घरी आल्यानंतरही संशयिताचा त्रास सुरूच होता. अखेर पीडितेने पतीला सांगितले. पतीने ६ एप्रिल २०२२ रोजी संशयिताला समजाविण्याचा प्रयत्न केला असता संशयित पोलीस कर्मचाऱ्याने पीडितेच्या नवऱ्याला शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

मी तुझ्या नवऱ्याला पोलिसी  झटका दाखवतो. तुला भोगून माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. तुझ्यावर बलात्कार करेन. तुला जायचं तिथे जा, असे पोलीस कर्मचाऱ्याने विवाहितेला  म्हटल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. अखेर पीडितेने आज,२६ एप्रिल रोजी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून बबनराव संगाळे याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर पोलीस करत आहेत.

दुपारी गुन्हा दाखल, संध्याकाळी निलंबन
दरम्यान, या प्रकरणाची कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी गंभीर दखल घेतली आहे. दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संशयित पोलीस कर्मचारी बबनराव रुस्तुमराव संगाळे याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित केले आहे.