मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने कवी संमेलन! कवितेतील संदेशामधून समाज उभा राहतो- प्रा.डॉ.देशमुख यांचे प्रतिपादन

 
yyug
बुलढाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साहित्य हे सामाजिक दस्ताऐवज असते, त्यामुळे समाजाचे प्रतिबिंब साहित्यातून उमटले पाहिजे. जर तुम्हाला पुढे जायचं असेलतर गाव सोडलं पाहिजे, शिकलं पाहिजे.. मूळ झाडापेक्षा कलम केलेल्या झाडाला जास्त फळं येतात. हा सृष्टीचा नियम आहे. कवितेच्या २ ओळीतून जो संदेश दिल्या जातो त्यातून समाज उभा राहतो, असे मनोगत ‘बारोमासकार’ प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त ‘निमंत्रीतांचे कवी संमेलन’ काल, शुक्रवार २० जानेवारी रोजी सायंकाळी प्रगती वाचनालयात संपन्न झाले, त्यावेळी उद्घाटनपर मनोगतात प्रा. डॉ.सदानंद देशमुख बोलत होते. यावेळी काव्यमंचावर अध्यक्षा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षिका श्यामल खोत, नायब तहसिलदार अश्विनी जाधव, डॉ.गणेश गायकवाड, सुभाष किन्होळकर, प्रा.डॉ.कि.वा.वाघ उपस्थित होते. 

प्रास्ताविकातून प्रा.वाघ यांनी मराठी भाषा संवर्धनाविषयी जो पंधरवाडा सुरु आहे त्याबद्दल माहिती देवून ते पुढे म्हणाले की, भाषा ही कायम उत्क्रांत होत असते. ती टिकवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. संस्कृत व प्राकृत अशा मराठी भाषेला फार मोठा इतिहास असून त्या भाषेच्या संवर्धनासाठी पंधरवाडा साजरा करावा लागतो, याबाबत त्यांनी मात्र खंत व्यक्त करुन तरीही हा पंधरवाडा विविध पातळीवर शासकीय माध्यमातून चांगल्या प्रकारे साजरा होत असल्याचे सांगितले. उद्घाटनपर मनोगतात प्रा.सदानंद देशमुख यांनी त्यांचा साहित्य व काव्य प्रवास विषद करुन अगदी सुरुवातीच्या काळातील हुंडा तथा मुलीच्या लग्नावरील कविता सादर केली.

यानंतर कवि संमेलनाला सुरुवात झाली. प्रा.रविंद्र साळवे यांनी ‘मोर्चा’ तर सुरेश साबळे यांनी ‘चळवळ’ कविता सादर केली. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी ‘मराठी म्हणजे’ व ‘पत्रकारीता’ यावर, अमरचंद कोठारी यांनी बालकविता,संदीप राऊत यांनी ‘काय लिहावं, कशासाठी लिहावं’ तर विजय बावस्कर यांनी गझर सादर केली. डॉ.वैशाली निकम यांनी पावसावरील तर डॉ.माधुरी चाटे यांनी सावित्रीबाई फुलेंवरील कविता सादर केली. युवराज कापरे व सुभाष किन्होळकर यांनीही त्यांची कविता सादर केली. सुत्रसंचालन सौ.वैशाली तायडे यांनी हळदी-कुंकू काळात पुरुषांची होणारी अवस्था एका वऱ्हाडी काव्यातून अगदी गंमतीदारपणे सादर केली. याशिवाय दोन काव्य रसिकांनीही त्यांच्या कविता सादर केल्या.

अध्यक्षीय मनोगतात श्यामल खोत यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाची माहिती देवून, त्यांच्या घराण्यात असणारी साहित्य परंपरा विषद केली. यावेळी त्यांनी त्यांच्या ३ दर्जेदार कविता सादर केल्या. याप्रसंगी प्रा.शाहीना पठाण, डॉ.विजया काकडे, रविकिरण टाकळकर, डॉ.गजेंद्र निकम, पंजाबराव गायकवाड, डॉ.मारोती चाटे, राम सोनुने, मकरंद व मैत्री लांजेवार यांच्यासह अनेक काव्य रसिक प्रामुख्याने उपस्थित होते.