अंधाऱ्या जगण्यात उजेडाची पेरणी! रामदास पंडित यांचे मरणोत्तर नेत्रदान; वाचावीच अशी प्रेरणादायी बातमी...

 
ytty
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आयुष्यात दृष्टीला फार महत्त्व आहे. अंधत्वामुळे समाजात अनेक जण दृष्टीहीन जीवन जगत आहेत.अशात देऊळगाव राजा येथील रामदास पंडित यांनी मरणोत्तर नेत्रदान करून, दृष्टीहीना सोबतच आपल्याही आयुष्याचे सार्थक केले.

रामदास पंडित यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा ७ वर्षांपूर्वी  संकल्प केला होता. पत्रकार राजेश पंडित यांचे वडील रामदास पंडित यांचे ३ जानेवारी २३ रोजी पहाटे ३ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू पश्चात त्यांचे मरनोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांचा मुलगा राजेश पंडित व त्यांचे नातेवाईक नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष सुनील शेजुळकर यांनी घेतला व जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष डॉक्टर अशोक काबरा व जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे डायरेक्टर सन्मती जैन यांना माहिती देऊन नेत्रदान करून घेणे बाबत कळविले. त्यानुसार जालना येथील गणपती नेत्रालयाच्या डॉक्टर राधिका दरक व त्यांच्या चमुने येऊन नेत्रदान प्रक्रिया पार पाडली.

नाभिक समाजाच्या १०८ महिला व पुरुषांनी  ११ ऑक्टोंबर २०१६  रोजी सामूहिकरीत्या मरनोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केलेला होता. त्या दिवशी नाभिक समाजाचे जेष्ठ नागरिक म्हणून रामदास पंडित यांनी सर्वप्रथम मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलेला होता. त्याची आठवण म्हणून त्यांच्या परिवारातील सदस्यांनी वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केल्याने या परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. रामदास पंडित यांचे पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी,तीन मुले ,सुना,नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.अंधत्वामुळे संपूर्ण जीवनच अंधकारमय झालेल्यांना नेत्रदान चळवळ ही जगण्याची एक आशा आहे. नेत्रदान सर्वात श्रेष्ठ दान असून नेत्रदान करून दृष्टीहीनाला नवी दृष्टी दिल्यास दात्यासह दृष्टीहीनाचे आयुष्य सार्थकी लागेल हे निश्चित आहे.