शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. डॉ. राजेंद्र शिंगणे ऍक्शन मोडवर! रोह्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा पिकविम्यात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार!

अधिकाऱ्यांना म्हणाले त्यांची नसबंदी करा! देऊळगावराजात पार पडली बैठक

 
ssss
देऊळगावराजा: रोह्यांच्या त्रासामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे धावून आलेत. शेतकऱ्यांनी त्यांची अडचण डॉ. शिंगणे यांना सांगितल्यानंतर आज, १ ऑगस्ट रोजी त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी देऊळगाव राजा येथील पंचायत समितीच्या सभागृहात त्यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आ. डॉ. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

देऊळगाव राजा,सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतातील पिकांचे रोह्यांनी नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत अशा सूचना आमदार डॉ.शिंगणे यांनी यावेळी दिल्या. रोह्यांची प्रजनन क्षमता जास्त असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांची नसबंदी करा. वनक्षेत्राला कुंपण करा असे निर्देश त्यांनी दिले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना द्या असेही आमदार डॉ.शिंगणे म्हणाले. रोही तसेच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा पिकविण्यात समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्दही यावेळी डॉ. शिंगणे यांनी दिला. या बैठकीला उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.