नेताजींच्या जयंती दिनी'आझाद हिंद'चा शासन-प्रशासना विरोधात बुलडाण्यात आक्रोश! मोर्चाने जिल्हा कचेरी दणाणली!

 
Tgyt
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  देश गौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती व पराक्रम दिवसाच्या अनुषंगाने विविध मागण्या घेऊन आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वी जाहीर केलेला आक्रोश निषेध मोर्चा आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने २३ जानेवारीला जिल्हा कचेरीवर धडकला. दरम्यान मागण्यांचे निवेदन देऊन शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी निषेधात्मक घोषणांनी परिसर दणाणला होता.

 गौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती केंद्र सरकारने पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचे अध्यादेश पारित केलेले असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने पराक्रम दिवस साजरा करण्याचा आदेश अध्याप दिला नाही. याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, जिल्ह्यातील वरली मटका, क्लब चालवण्यासाठी शासकीय जागेचा वापर होत आहे. याला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, महाराष्ट्रातील गेल्या दोन वर्षात अपहरण झालेल्या मुली आणि महिलांची आकडेवारी जाहीर करावी, कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये तर सोयाबीनला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये हमीभाव द्यावा, उपवन संरक्षक अक्षय गजभिये यांच्या गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी यासह १५ मागण्यांचे  निवेदन देण्यात आले आहे.

या आंदोलनात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे, आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखा निकाळजे यांच्यासह बहुसंख्य महिला व पुरुषांचा सहभाग होता.