आता "परीक्षा पे चर्चा!' विद्यार्थ्यांनो कूंचल्यातून साकारा कलाकृती! एक्झाम वॉरियर्स चित्रकला स्पर्धेचे आमदार श्वेताताई महालेंकडून आयोजन..! विद्यार्थ्यांनो असे व्हा सहभागी...

 
shwetatai mahale
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  कुंचल्यातून साकारलेली कलाकृती म्हणजे चित्र,अशी चित्राची सर्वसामान्य व्याख्या करता येते. रंगविण्याच्या प्रक्रियेतच चित्र घडले जाते. ही संधी आमदार श्वेताताई महाले यांच्या पुढाकाराने समोर आली आहे.२१ जानेवारीला चिखली विधानसभेतील विविध शाळांमध्ये एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खेळा, बागडा आणि परीक्षेतून शिका  असा मूलमंत्र आ.श्वेता महाले यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.'एक्झाम वॉरियर' अर्थात चित्रकला स्पर्धा असा हा उपक्रम आहे. इयत्ता ९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची नाव नोंदणी online पध्दतीने www.parikshapecharcha.online या लिंकवर करायची आहे. यासाठी रंग ब्रश व चित्रकलेसाठी आवश्यक ते साहित्य स्पर्धकाने घरून आणायचे आहे. आयोजकांतर्फे ड्रॉइंग शीट पुरवण्यात येईल. स्पर्धा सुरू होण्याअगोदर प्रत्येक विद्यालयामध्ये ड्रॉइंग शीट आयोजका तर्फे पोहोचवण्यात येतील. रंग कामाचे साहित्य विद्यार्थ्यांसाठी पेन्सिल कलर, क्रेऑन,ऑइल  पेस्टल,वॉटर कलर,पोस्टर कलर, मिक्स मीडिया कुठल्याही प्रकारचे साहित्य आणावे लागेल.

एक्झाम वॉरियर्स’साठी आ. श्वेताताईंचा मंत्र...

 परीक्षा एखाद्या सणासारख्या आहेत. त्या सणासारख्याच साजऱ्या कराव्या. ज्ञान हेच स्थायी आहे, ते जतन करा.
जर स्पर्धा करायचीच असेल तर ती स्वत:शीच करा. इतर कुणाशीही नव्हे.वर्तमानच सर्वस्व आहे, त्यातच जगा. स्वत:साठी प्रेरणा बना.नेहमी नकारात्मकतेपासून ४ हात दूरच राहा. खेळा, बागडा; त्यातूनच शिका, असा मूलमंत्र सौ. श्वेताताई महाले यांनी दिला.

काय आहेत विषय?

 -कोरोना लसीकरण मध्ये भारत नंबर एक
 -सर्जिकल स्ट्राइक 
-  जी २०  जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल 
-  बेटी बचाव बेटी पढाओ
-  आजादी का अमृत महोत्सव

प्रत्येक शाळेतील पहिल्या तीन सर्वोत्तम चित्रांसाठी बक्षिसे

 या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मधून शाळा निहाय तीन सर्वोत्तम चीत्रांमधील पहिल्या क्रमांकासाठी ३१००रू , दुसऱ्या क्रमांकासाठी २१०० रू तर तिसऱ्या क्रमांकासाठी ११०० रू. तसेच स्मृतीचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाण पत्र सुद्धा देण्यात येणार आहे.