'एक था टायगर' नव्हे खूप सारे बिबट!कधी माणसांवर हल्ला तर कधी पशुधन फस्त!

 
Chitta

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ज्ञानगंगा अभयारण्यात तीन वर्षांपूर्वी पट्टेदार वाघाचा अधिवास होता. तो मादीच्या शोधार्थ दाखल झाला आणि काही काळानंतर कुठे परतला ते माहित नाही. तेव्हा 'एक था टायगर' असे शब्द कानावर ऐकू येत होते. आताही टायगर आहेत परंतु पट्टेदार नाही तर काळ्या ठिपक्यांचे खूप सारे म्हणजे जवळपास ३० बिबट आहेत. कधी राजुर घाटात तर कधी बोथा मार्गावर कधी ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीवर त्यांचे दर्शन होते. कधीकधी शेतशिवारात त्यांचा धुमाकूळ चालतो. खाद्याच्या शोधात असलेले हे बिबट मग पाळीव प्राण्यांवर व माणसांवरही हल्ले करतात. चिखली तालुक्यातील उदयनगरात एका युवकावर २७ जानेवारीला बिबट्याने हल्ला केल्याची बातमी धडकली.ओम भगवान गायकवाड असे जखमीचे नाव आहे. त्याची प्रकृती सध्या ठीक आहे

.ज् अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे जवळपास ३० बिबट्यांसह अन्य प्राणी वावरत असून, बुलडाणा -खामगाव मार्गावर नुकतेच एकाच वेळी २ बिबट्यांचे चिंच फाट्या नजीक दर्शन झाले होते. बिबट्यांचे, अस्वलांचे दर्शन होणे हे नवे राहिले नाही. कधी राजुर घाटावर कधी खामगाव- बोथा मार्गावर तर कधी आजूबाजूच्या शेतशिवारात अस्वल,बिबट्या सहज आढळून येतो. माणसाच्या अस्तित्वासाठी आणि निसर्गाच्या संतुलनासाठी वन्यप्राण्यांची दिवसगणीक घटत जाणारी संख्या ही एक गंभीर समस्या बनली आहे. तरी वन्य प्राण्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.

दरम्यान मानव व प्राण्यांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या देखील उडत आहेत. चिखली तालुक्यातील उदयनगर येथून जवळ असलेल्या डासाळा येथे शेतात बकऱ्या चराईसाठी निघालेल्या भगवान गायकवाड या युवकावर २७ जानेवारीला दुपारी बिबट्याने हल्ला चढविला. तर २६ जानेवारीला सकाळी किनी सवडत गावातील कुसुंबा शिवारात गोठ्यात बांधलेल्या २ जनावरांना बिबट्याने ठार केल्याची घटना घडल्याचे सहदेव भास्कर धुरंदर यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला. एकीकडे बिबट्यांची संख्या वाढत असून बिबट किंवा अस्वलांचे हल्लेही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे वनविभागाने उपाय-योजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.