नागराज मंजुळे बुलडाण्यात दाखल! महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे करणार उद्‌घाटन

 
5325
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे आज, २३ एप्रिलला सकाळी साडेसातला बुलडाणा शहरात दाखल झाले. महाकवी वामनदादा कर्डक पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.

गर्दे वाचनालय परिसरात उभारण्यात आलेल्या ताराबाई शिंदे साहित्यनगरीत हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. भुसावळपर्यंत रेल्वेने आल्यानंतर तिथून वाहनाने नागराज मंजुळे बुलडाणा शहरात दाखल झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मंजुळे यांचे स्वागत केले.

सकाळी ११ वाजता साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन होणार असून, तत्पूर्वी ग्रंथ प्रदर्शनी व विक्री स्टॉलचे उद्‌घाटन होणार आहे. दरम्यान, शाहीर डी. आर. इंगळे यांच्या लढाई जाती अंताची या काव्यसंग्रहाचे तसेच डॉ. प्रतिभा वाघमारे लिखित वामनदादांच्या गजलांचे सौंदर्य विश्व या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी साडेबारा ते दीड या पहिल्या सत्रात वामनदादा कर्डक राज्यस्तरीय गायन स्पर्धेतील विजेत्यांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी दीड ते तीन यावेळेत दुसऱ्या सत्रात वामनदादांच्या काव्यातील वैश्विक जाणिवा या विषयावर परिसंवाद होणार आहे. तिसऱ्या सत्रात मी पाहिलेले, वाचलेले वामनदादा या विषयावर आधारित टॉक शो होणार आहे. साडेचार ते साडेपाच या वेळेत चौथ्या सत्रात निमत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. संध्याकाळी साडेपाच ते साडेसात यावेळेत संमेलनाचे समारोपीय सत्र होणार आहे.