नागराज मंजुळे शनिवारी बुलडाण्यात; महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे करणार उद्घाटन

 
nagraj manjule
 बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रसिद्ध कवी, लेखक , दिग्दर्शक नागराज मंजुळे शनिवारी २३ एप्रिल रोजी बुलडाण्यात येणार आहेत. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बुलडाणा शहरातील गर्दे वाचनालय परिसरात महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल, १७ एप्रिल रोजी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 या संमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबईचे प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे राहणार आहेत. यावेळी मुख्य निमंत्रक म्हणून मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख, संमेलनाचे कार्याध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप जाधव व स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी साडेदहाला हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून साहित्य संमेलन परिसराला ताराबाई शिंदे साहित्य नगरी असे नाव दिले जाणार आहे. एका प्रवेशद्वाराला  स्व. नरेंद्र लांजेवार तर दुसऱ्या प्रवेशद्वाराला शाहीर गवई - मिसाळ यांचे नाव दिल्या जाणार असल्याचे रविकांत तुपकरांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रा. रवींद्र इंगळे, शाहीर डी.आर.इंगळे, कुणाल पैठणकर, प्रा. शशिकांत जाधव, शैलेश खेडेकर, शाहिनाताई पठाण, विजयाताई काकडे यांची उपस्थिती होती.