२९२ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीला मृगाचा मुहूर्त! ६ जूनला निघणार 'लॉटरी' !!

 
saheb
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान मुदत संपणाऱ्या २९२ ग्राम पंचायतींचा आरक्षण सोडतीचा मुहूर्त अखेर ठरलाय! खरीप हंगामाच्या धामधुमीत व मृग नक्षत्राच्या तोंडावर म्हणजे ६ जून रोजी आरक्षणाची लॉटरी काढण्यात येणार असून १७ जूनला जिल्हाधिकारी याला अंतिम मान्यता देणार आहे.
या २९२ मध्ये बुलडाणा तालुक्यातील १२, चिखलीतील ३१, देऊळगाव राजा १९, सिंदखेडराजा ३०, मेहकर मधील ५०, लोणार ४१, खामगाव १८, शेगाव १०, जळगाव जामोद १९, संग्रामपूर २२, मलकापूर  व नांदूरयातील प्रत्येकी १४, तर मोताळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या सोडत काढण्यासाठी ३ जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. ६ तारखेला १३ तहसीलदारानी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात येणार आहे. ७ तारखेला प्रभागनिहाय आरक्षणचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आल्यावर ,७ ते १० जून दरम्यान यावर हरकती व सूचना दाखल करता येतील. यावर एसडीओ १५ तारखेपर्यंत हरकती लक्षात घेऊन अभिप्राय देतील. हे अभिप्राय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस मान्यता देणार आहे. अंतिम प्रभाग रचना ( नमुना अ )  २० जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.