मांजा नव्हे धारदार शस्त्र! पतंगीचा मांजा ठरतोय पक्ष्यांच्या गळ्याचा फास! 'मी लोणारकर' टीम ची नायलॉन मांजावर बंदीची मागणी

 
yit
लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  प्लॅस्टीक व नॉयलॉनचा दोरा पशुपक्ष्यांसाठी फास ठरत आहे. काचेचे बारीक तुकडे,धातू व लोखंडाचा भुगा,अ‍ॅल्मिनियम ऑक्साईड व झिरकोनियम ऑक्साईडचा वापर केला जात असल्याने हा मांजा धारधार शस्त्रप्रमाणे होतो. परिणामी पशुपक्षी अनपेक्षित पणे बळी पडतात.संक्रांत सणामध्ये पतंग उडवण्याची परंपरा असल्याने पशुपक्ष्यांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून, 'मी लोणारकर' टीम ने जिल्हाधिकारी यांच्याकडे नायलॉन मांजावर बंदी आणण्याची मागणी रेटली.

मकर संक्रांतीचा उत्सव आता काही दिवसांवर आला आहे. धार्मिक महत्वाप्रमाणे पतंग उडवण्याची परंपरा देखील मकर संक्रातीला आहे. सक्रांतीच्या आठवड्यापुर्वीच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्‍याच ठिकाणी भव्य पतंगोत्सवाचे आयोजन असते.अनेक ठिकाणी स्पर्धा देखील घेतल्या जातात. परंतु मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्त उडवले जाणाऱ्या पतंगासोबत चायनीज मांजा वापरला जातो. यामुळे अनेक अपघात होतात. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. त्यामुळेच सरकारने त्यावर बंदी आणली आहे. त्यानंतरही चीनी मांजा चोरी-छुपे तयार केला जातो आणि विकला जातो. खरं तर पतंगीच्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकला असता, पतंगाचा जन्म खरा चीनमध्ये झाला.

सुमारे ३ हजार वर्षांपुर्वी चीनमधील एका शेतकऱ्याने आपल्या टोपीला दोरा बांधून उडवल्याचे म्हटले जाते. तिच खरी पतंगाची सुरुवात होती. त्यानंतर कागदापासून पतंग करुन उडवले जाऊ लागले. चीनमधून पतंगाचा प्रवास भारतात झाला. चीन व कोरीयामधील प्रवाशी पतंग घेऊन भारतात आले. त्यानंतर पतंग भारतात आले आणि उडवले जाऊ लागले. असे असले तरी, बुलडाणा जिल्ह्यात देखील पतंग उडविण्याची परंपरा संक्रांत सणाला आहे. राष्ट्रीय हरित लवाद कडून नायलॉन चायनीज मांजावर बंदी घालण्यात आली. यावर कारवाईचीही मागणी करण्यात आलीआहे. हीच मागणी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना बुलडाणाच्या वतीने सचिन कापुरे यांनी 'मी लोणारकर' म्हणून लोणार तहसीलदार यांच्याकडे केली.

आपल्याच देशात बनतो मांजा..

पतंगासाठी चीनमधून मांजा भारतात आला का? मग त्याला चीनी मांजा का म्हणतात? हे प्रश्न विचारले जातात. परंतु चीनी मांजा नाव असले तरी तो चीनमधून येत नाही. तो आपल्याच देशात बनवला जातो. त्यावर केंद्र सरकार व एनजीटी म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादाने बंदी आणली आहे. त्यानंतरही त्यांची चोरी-छुपे निर्मिती देशात केली जाते अन् विक्री होते. परंतु कारवाई नाममात्र होते.