आयुष्याची दोरी कापू शकते मांजा! बुलडाण्यात पतंगाचा बळी!अपघातांच्या 'संक्रांतीवर' महावितरण काय म्हणते?

 
patang
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात.परंतु पतंग उडवताना पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते.१४ डिसेंबरला वावरे ले-आउट येथील एका १३ वर्षीय मुलाचा तारेवरून पतंग काढताना दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागात विद्युत वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरलेले आहे. मात्र पतंग उडवताना या यंत्रणेपासून दूर राहावे. शासनाने चायनीज मांजावर बंदी घातली आहे. साध्या धाग्यांने पतंगप्रेमीनी मोकळ्या मैदानात पतंग उडवावा. विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. कारण विद्युत वाहिन्यांचे एकमेकावर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानीची शक्यता असते. घराच्या गच्चीवरून, रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. विद्युत वाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे.

धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा. कारण धातुमिश्रीत मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात विद्युत प्रवाहीत होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.तसेच वीज वाहिन्याच्या दोन खांबाच्या मधात वीज वाहिन्यात अडकलेले पतंग काढता येत नाही. त्यामुळे वीजपुरवठा विस्कळीत होऊन,ताराला तारा भिडल्याने होल्टेज वाढू शकते आणि मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. बुलडाण्यात १४ वर्षीय मुलगा प्रणव विनोद बोरकर हा लोखंडी सळीने विद्युत तारेतील पत्ता काढत असताना जागीच गतप्राण झाला. यवतमाळ शहरातील महावितरणच्या वित्त व लेखा विभागातील अधिकारी, कार्यालयीन कामाकरीता मोटर सायकलने  जात असतांना चायनीज मांजामुळे त्यांचा गळा चिरून ते गंभीर जखमी झाले. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे तात्काळ वीजपुरवठा खंडित करून तातडीची मदत करणे सोईचे होईल. असे आवाहन महावितरणने केले आहे.