खासदार प्रतापराव जाधवांनी दिली शेतकऱ्यांना GOOD NEWS! म्हणाले, केंद्र सरकारने तेलबियांवरील निर्बंध हटविल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढणार..

 
jadhav
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सोयाबीन सह तेलबियांवरील निर्बंध केंद्र सरकारने हटविल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होत आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी  केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह यांच्याकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. 

शेतकऱ्यांकडून उत्पादित होणाऱ्या तेलबियांवरील स्टॉक लिमिट हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठीचे निवेदन २ एप्रिल २०२२ रोजीच खा.जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. त्यानंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे सातत्याने यासंबंधीचा पाठपुरावा केला होता. लोकसभेतही खा.जाधव यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.  त्यानंतर  केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर लादलेली स्टॉक लिमिटची मर्यादा उठवली आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रतिक्विंटलमागे अधिकचा दर मिळत आहे. भविष्यात सोयाबीनच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात तेलबियांच्या दरात वाढ झाल्यास सोयाबीनला भविष्यात आणखी चांगला भाव मिळेल. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असा आशावाद खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.