या डोळ्यांकडे खरेच डोळे वळावे! बालगृहातील मुलांची नेत्रतपासणी

 
hyfg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तसे तर डोळे हा फार नाजूक अवयव! वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आधीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पण लक्ष कोण देतो? मात्र जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ७ जानेवारीला शासकीय मुलांचे निरीक्षण बालगृहातील बालकांच्या नेत्र तपासणी साठी पुढाकार घेतला. हीच चिकित्सा प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. शोन चिंचोले यांनी संस्थेमार्फत केली.

डोळ्यांची काळजी घेणे प्रत्येकांची गरज आहे. मात्र जे अनाथ, निराधार किंवा निरीक्षण गृहात असतात त्यांची काळजी कोण घेणार? हा प्रश्न मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्षाने सोडविला आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांच्या मार्फत ७ जानेवारीला शासकिय मुलांचे निरीक्षण, बालगृह येथील बालकांची नेत्र तपासणी नेत्ररोग तज्ञ डॉ.शोन चिंचोले यांच्यामार्फत संस्थेत करण्यात आली. यावेळी त्यांची सहकारी टीम,बाल न्याय मंडळ येथील प्रमुख न्याय दंडाधिकारी जमादार मॅडम, सदस्य बाल न्याय मंडळ श्री.भालेराव सर,जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे समुपदेशिका श्रीमती शारदा पवार, संस्थेचे शिक्षक श्री.घुबे उपस्थित होते. बालकांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी,निरोगी डोळ्यांसाठी आहार  याबाबत डॉक्टरांनी मुलांना मार्गदर्शन केले.
अशा प्रकारे समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर यांनी मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शनसाठी संस्थेतील बालकांना वेळ द्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

लहानग्यांचा आहार असा असावा..

डोळे फार नाजूक असतात.वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आधीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लहानग्यांचा आहार चांगला असावा. 'व्हिटॅमिन ए'युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, पपई, संत्रे इत्यादींचे नियमित सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले.

समाजातील दानशूर पुढे यावे..

बालगृहात व निरीक्षणात गृहातील बालकांना सामाजिक उत्तरदायित्व आवश्यक असते बालकांचे आरोग्य,जीवन कौशल्य, रोजगार इत्यादी विषय समाजातून मदतीची गरज असते अशाच प्रकारची मदत डॉ. शोन चिंचोले यांचे मार्फत बालगृहातील बालकांना होत असून समाजातील दानशूर व्यक्तींनी देखील अश्याच प्रकारे मदत करावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.अशोक मारवाडी म्हणाले.