लोणारची पौराणिक मंदिरे पाण्यात! लोणार सरोवराच्या पाणी पातळीत होतेय वाढ;सरोवराची आम्लता धोक्यात! वाचा काय आहेत कारणे...!
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जगातील वैज्ञानिकांना संशोधनासाठी पर्वणी ठरणाऱ्या बेसाल्ट खडकांनी निर्मित उल्कापाती लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने या सरोवराच्या सभोवताली असणाऱ्या हेमाडपंथी पौराणिक मंदिरापैकी ५ मंदिरे पाण्याखाली गेले.या पौराणिक वास्तूंना धोका निर्माण झाला आहे.
लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने सरोवराच्या आम्लतेवर परिणाम होणार असून पौराणिक वास्तूंना धोका निर्माण झाल्याने पर्यटक प्रेमी कडून चिंता व्यक्त केली जात आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराला जागतिक वारसा असताना नैसर्गिक चमत्काराने उल्कापाती विवराकडे जगातील वैज्ञानिकांची अभ्यासा करिता प्रयोगशाळा आहे. या सरोवराच्या काठावरच पौराणिक महत्त्व असलेली गायमुख वीरज धारातीर्थ असून पापाहरेश्वर तीर्थ धार आहे.
तर सीतान्हानी म्हणून एक अखंड धार वाहते. या तीनही ठिकाणाहून अखंडरीत्या पाणी वाहत असून सरोवरामध्ये असणारे रामगया व इतर ठिकाणचे पाण्याचे झरे सुद्धा खळखळून वाहत आहे.या सर्व ठिकाणी पाणी सरोवरामध्ये हजारो लिटर पाणी दररोज मिळत असल्यामुळे सरोवराच्या पाण्यामध्ये सतत वाढ होत आहे. यामुळे कमळजा मातेच्या मंदिरासमोरील पौराणिक महत्त्व असणारी सासु सुनेची विहीर पूर्णतः पाण्यामध्ये डूबली असून, काळा पाषाणातील हेमाडपंथी पौराणिक विष्णू महादेव मंदिर बगीचा मंदिर,मोर महादेव मंदिर, चोपडा महादेव मंदिर,मुंगळा महादेव मंदिर ही पाच पौराणिक मंदिरे पूर्णतः पाण्यामध्ये गेल्याने या प्राचीन वास्तूंना धोका निर्माण झाला आहे.
सर्व परिसरातील संपूर्ण मंदिराची संरक्षण व जतन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे असून या विभागामार्फत गंगा भोगावती विरजधारा तीर्थावर आंघोळीसाठी कोविड काळापासून बंदी घालण्यात आली. या ठिकाणाहून या परिसरातील नागरिक पिण्यासाठी धारेचे पाणी भरत होते. परंतु ही बंदी झाल्यामुळे हे संपूर्ण पाणी धारेमध्ये जात असल्याने हे पाणी सरोरामध्ये मिसळत आहे. वीरज धारातीर्थावरील व पापारेश्वर तीर्थावरील पाण्याचे नियोजन करून हे पाणी धारतीर्थावर असणाऱ्या बगीच्या मध्ये वापरण्यात आल्यास अथवा हे पाणी नागरिकांना वापरण्यासाठी खुले केल्यास सरोवरामध्ये जाणाऱ्या पाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात फरक पडू शकतो यासाठी पर्यटन विभागाने, वनविभागाने पुरातत्व विभागाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी, सरोवराकडे जाणाऱ्या पाण्याबाबत काही उपाययोजना करावी, असे मत लोणार सरोवर मित्र मंडळाचे सचिन कापुरे यांनी व्यक्त केले आहे.