पशुपालक शेतकऱ्यांनो लम्पी स्किन आजाराला घाबरु नका! जिल्ह्यात ९७ हजार ६०० लसी उपलब्ध! २१ हजार गुरांना टोचली लस! तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास "या" क्रमांकावर करा संपर्क!

 
gay
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यासह जिल्ह्यातही जनावरांना होणाऱ्या लम्पी स्किन या आजाराने थैमान घातले आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. जिल्ह्यात आजघडीला ९७ हजार ६०० लसी उपलब्ध झाल्या असून आजपर्यंत २१ हजार ७७१ गुरांना लस टोचण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७१ गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाली आहे. लम्पी स्किन आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला असून  पशुपालक शेतकऱ्यांना या आजारासंदर्भात कुठलीही अडचण कक्षाशी फोनवरून संपर्क साधता येणार आहे.

लम्पी स्किन हा आजार पशुंपासून माणसांना होत नाही . हा रोग नियमित उपचाराने बरा होतो. पशुपालकांनी जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा पंचायत समिती किंवा जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
  
ही आहेत लक्षणे अशी घ्या काळजी..

लम्पी स्किन हा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार देवी विषाणू गटातील कपिप्रोक्स प्रवर्गातील आहे.  हा संसर्गजन्य आजार असून याचा प्रसार चावणाऱ्या माशा, गोचीड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा आणि पाणी यामुळे होतो. यामुळे जनावरांच्या अंगावर १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी  तयार होतात. सुरुवातील भरपूर ताप येतो. डोळे , नाकातून चिकट स्राव येतो. जनावरे चारा पाणी कमी किंवा बंद करतात.दूध उत्पादन घटते.

काही गुरांच्या पायावर सूज येऊन ते लंगडतात. पशुपालकांनी गोठ्यात डास, माशा, गोचीड होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जनावरांवर उपचार करतांना नवीन सुयांचा वापर करावा. बाहेरील व्यक्ती किंवा डॉक्टर गोठ्यात येत असल्यास आधी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. आजार सुरू असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी विक्री थांबवावी. बाधित गुरांना   ताबडतोब इतर गुरांपासून वेगळे ठेवावे. गोठ्यात सोडियम हायपोक्लोराइड फिनाईल फवारणी करावी.
   जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष संपर्क: डॉ. ए.बी. लोणे 8329122297, डॉ. आर.एस.पाटील 9689330341, डॉ. टी .एस.पाटील 8999918104,  डॉ. उईके 7841853224, डॉ. जुंडळे 9403740047