अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप; साथीदाराला ५ वर्षांचा कारावास; बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल!

 
856
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सैलानी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप तर मुलीला पळवून नेण्यासाठी मदत करण्याऱ्या दुसऱ्या  आरोपीला ५ वर्षांचा सश्रम कारावास  अशी शिक्षा बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. काल, २१ एप्रिल रोजी बुलडाणा येथील विशेष न्यायाधीश आर. एन.मेहरे यांनी हा निकाल दिला. शिक्षा ठोठावण्यात आलेले दोन्ही आरोपी परभणी जिल्ह्यातल्या रहिवासी असून त्यांनी  मूळच्या परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व आईसोबत सैलानीला आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २०१६ मध्ये अपहरण केले होते.  

आरोपी अशोक सदाशिव पवार व त्याचा मित्र बालाजी उर्फ बाळू महादेव पुरी या दोघांनी २० जुलै २०१६ रोजी दुपारी सैलानी येथून मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. त्यानंतर जालना, मनमाड, पुणे, कात्रज येथे अल्पवयीन मुलीवर आरोपी सदाशिव पवार याने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिच्यावर अत्याचार केला होता.

पीडित मुलीच्या आईने परभणी जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात आधी तक्रार दाखल केली होती त्यानंतर घटनास्थळ बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा रायपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. रायपूर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत पीडित मुलीची सुटका केली होती. त्यानंतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकारी पक्षाच्या वतीने पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक पवार याला जन्मठेप  व त्याचा साथीदार बालाजी पुरी याला  ५ वर्षे  सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ बाबुसिंग बारवाल यांनी सहकार्य केले.