जाऊ देवांचीया गावा..! सुखद ब्रेकिंग! दोन वर्षानंतर लालपरीला मिळाली वारकऱ्यांच्या सेवेची संधी!! १६८ एसटीबस सह कर्मचारी सुसज्ज !

कोरोनारुपी राक्षसाच्या प्रकोपामुळे पृथ्वीवरील स्वर्ग अशी ख्याती असलेल्या पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्य भरणारी महायात्रा सलग २ वर्षे रद्दबादल ठरली. यंदा कोरोना मुक्तिमुळे लक्षावधी भाविकांच्या साक्षीने साजरा होणारा हा सोहळा रंगणार आहे. यामुळे भविकासह एसटी महामंडळ देखील उत्साहित झाले आहे. याचे कारण स्वार्थ - परमार्थ हे दोन्ही हेतू साध्य होणार आहे. यामुळे विभाग नियंत्रक संदीप रायलवार व विभागीय वाहतूक अधिकारी अमृत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीचे सुसज्ज नियोजन करण्यात आले असून आज, १६ जूनला दुपारी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
विदर्भासाठीचे भिमायात्रा स्थानक राहणार देवगावात
दरम्यान जिल्ह्यातील हजारो भाविकांसाठी जिल्ह्यातून ६ ते १६ जुलै दरम्यान १६८ यात्रा स्पेशल बस सोडण्यात येणार आहे. १० जुलै हा देवशयनी आषाढी एकादशीचा पवित्र सोनियाचा दिनू आहे. बुलडाणा आगारातून ३४, चिखली, जळगाव, मलकापूर आगारातून प्रत्येकी २२, खामगाव ३२, मेहकर २८ तर शेगाव आगारातून १० गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. बुलडाण्यासह विदर्भातील ११ जिल्ह्यासाठी देवगाव येथे भिमायात्रा बस स्थानक राहणार आहे. परतणाऱ्या विदर्भातील भाविकांनी अडचण टाळण्यासाठी हे स्थानक गाठावयाचे आहे.