पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार वसंत पाराशर यांना तर स्व. गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार कृष्णा सपकाळ यांना जाहीर!
पत्रकार कल्याण बहुउद्देशिय संस्था व चिखली तालुका पत्रकार संघातर्फे उद्या चिखली येथे होणार वितरण
Jan 5, 2023, 18:50 IST

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकार कल्याण बहुउद्देशिय संस्था चिखली आणि चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिना निमित्त दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांना सन्मानित केले जाते. यावर्षी पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार वसंत पाराशर ( मेहकर ) यांना तर स्व. गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार युवा पत्रकार कृष्णा सपकाळ ( अंचरवाडी ) यांना जाहीर झाला आहे. उद्या दि. ६ जानेवारी रोजी दर्पण दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
चिखली येथील स्थानिक देव्हडे बंधू यांच्या हॉटेल एचडीआर येथे सकाळी ११ वाजता पत्रकार कल्याण बहुउद्देशिय संस्था आणि चिखली तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.
चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास आ. श्वेताताई महाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के आणि मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांचा देखील सत्कार यावेळी होत आहे. तरी सर्व पत्रकार बांधवांनी या समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कमलाकर खेडेकर, सचिव तौफिक अहेमद, कोषाध्यक्ष छोटू कांबळे, सहसचिव इम्रान शहा यांनी केले.