तीर्थराज सम्मेद शिखर बचाव साठी एकवटला जैन समाज;सकल जैन समाजाचा बुलडाणा,लोणार, देऊळगावराजा, खामगाव शहरात शिस्तबद्ध मोर्चा! प्रतिष्ठांने बंद ठेवून झारखंड राज्य सरकारचा निषेध

भारत वर्षातील सकल जैन समाजाची काशी म्हणून जगभर झारखंड राज्यातील शाश्वत सम्मेद शिखरजीची ओळख आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सकल जैन समाजाचे 24 तीर्थंकर पैकी 20 तीर्थंकर मोक्षास गेले असून अनेक जैन मुनि सुद्धा या विशाल पर्वतावर मोक्षस गेले आहेत. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या या तीर्थक्षेत्रास झारखंड राज्य सरकारने वन्यजीव अभयारण्य व पर्यावरण पर्यटन केंद्र घोषित केल्यामुळे या जागेची पवित्रता धोक्यात आली असल्याचे समाज बांधवांचे म्हणणे आहे. हा सकल जैन समाजावर फार मोठा अन्याय या झारखंड सरकारने केलेला आहे, असा आरोप होतोय. याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर सकल जैन समाजाचे वतीने भारत बंदची हाक दिली जात आहे.
झारखंड राज्य सरकारने घेतलेला हा अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करावा व जे आदेश पारित केलेले आहेत ते परत घ्यावेत यासाठी ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे मार्फत केंद्र सरकार व झारखंड राज्य सरकारला निवेदन देण्यात येत आहे. सकल जैन समाजाचे वतीने 21 डिसेंबर रोजी बंदचे आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला देऊळगांव राजा, देऊळगांव मही, लोणार, बुलडाणा, खामगाव या शहरातील सर्वच व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली तर शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या व विविध सामाजिक संघटनाच्या प्रमुखांनी सकल जैन समाजाच्या या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.सकल जैन समाजाचे वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत केंद्र सरकार व झारखंड राज्य सरकारला देण्यात आले. शहरात दिवसभर सकल जैन समाजाने आपापली प्रतिष्ठांने बंद ठेवून झारखंड राज्य सरकारचा निषेध केला आहे.