बुलडाण्यात आगीच्या घटना वाढल्या!; जळगाव जामोद, मोताळा, चिखलीतही आग लागून लाखोंचे नुकसान, चालू महिन्यातच १५ घटना

 
46
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दिवसेंदिवस आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. काल, २२ एप्रिलला तीन ठिकाणी आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. जळगाव जामोद येथे दोन गोठ्यांना आग लागली. मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे दुकानाला आग लागली तर चिखलीत दोन जनरल स्टोअर्सला आग लागून मोठे नुकसान झाले.

45

जळगाव जामोद येथील वॉर्ड क्र. ६ मधील मंगेश नागोराव नंदाने यांच्या गोठ्याला दुपारी ४ वाजता भीषण आग लागली. आगीत गाय व वासराचा होरपळून मृत्यू झाला. टीनपत्रे, गुरांचा चारा यासह शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले. गोठ्याच्या शेजारी असलेल्या विष्णू भगवान अकोलकार यांच्या घराला सुद्धा आग लागून टिनपत्रासह घरातील साहित्याचे नुकसान झाले. जळगाव जामोद नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने व स्थानिक नागरिकांनी आग विझवली.

आगीत २ लाख ८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे २२ एप्रिलच्या पहाटे तीनच्या सुमारास महम्मद वसीम महम्मद रशीद यांच्या मेट्रो टेलर्स नावाच्या शिलाई मशीनच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीत शिलाई मशिन व ईदसाठी शिवणकामासाठी आलेले कपडे असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला.

गावकऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने आजूबाजूच्या घरांना आग लागली नाही. दुकान जळाल्याने महम्मद वसीम यांचे मोठे नुकसान झाले असून शासनस्तरावरून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. चिखलीत आठवडी बाजारातील दोन दुकानांना आग लागून व्यावसायिकांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले. २२ एप्रिलच्या पहाटे चारच्या सुमारास आठवडे बाजारातील गुरुनानक जनरल स्टोअर्स व हर्षा ट्रेडर्स ही दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

दोन्ही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील रहिवाशांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. चिखली नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आठवडी बाजारातील दुकानांची गर्दी लक्षात घेता मेहकर आणि खामगाव येथील अग्निशामक दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले. सकाळी ६ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे व नागरिकांच्या प्रयत्नांमुळे आठवडे बाजारातील इतर दुकानांचे मोठे नुकसान होण्याचा धोका टळला. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात आतापर्यंत आग लागण्याच्या १५ घटना घडल्या आहेत.