बुलडाण्यात नागराज मंजुळे म्‍हणाले, वामनदादांच्या साहित्याने दिली सामान्यांना जगण्याची उभारी!; महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचे थाटात उद्‌घाटन

 
7578
ताराबाई शिंदे साहित्यनगरी, बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्राण आणि त्यांची ऐतिहासिक कामगिरी हाच श्वास समजून महाकवी वामनदादा कर्डक यांनी चळवळीला आपले आयुष्य वाहिले. कलंदरसारखे आयुष्य जगणाऱ्या दादांनी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या आपल्या साहित्यकृतींनी लाखो करोडो दलित पददलित, गावकुसाबाहेर जगणाऱ्यांना जगण्याची उभारी दिली. त्यांची ही कामगिरी असामान्य व तेवढीच ऐतिहासिक ठरत असल्याचे आग्रही प्रतिपादन प्रख्यात चित्रपट निर्माता, निर्देशक, कवी नागनाथ मंजुळे यांनी येथे केले. महापुरुषांच्या पुतळ्यांना हार चढविला की त्यांचा व त्यांच्या आदर्शाचा विसर पडतो. त्यामुळे महापुरुषांचे कायम स्मरण राहण्यासाठी पुतळ्याऐवजी अत्याधुनिक ग्रंथालये उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी निःक्षून सांगितले.

 

725

मराठी चित्रपटांचा चेहरामोहरा बदलून किंबहुना प्रस्थापितांना आडवे करून अल्पावधीतच एक मैलाचा दगड ठरणारे नागनाथ मंजुळे यांच्या हस्ते येथील गर्दे वाचनालय सभागृहात आयोजित वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आपल्या लै भारी भाषणातून (नव्हे मनोगतातून) अण्णांनी भावना मांडल्या.

आपल्या साध्या पेहरावाप्रमाणेच अत्यंत साध्या शब्दात त्यांनी वामनदादा यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. बुलडाण्यात येऊन लई भारी वाटले, असे यावेळी ते म्हणाले. विचारपीठावर साहित्यिक अर्जुन डांगळे, स्वागताध्यक्ष तथा "स्वाभिमानी'कार  रविकांत तुपकर, कार्याध्यक्ष दिलीप जाधव, मंत्रालयीन अधिकारी सिद्धार्थ खरात, बारोमासकार सदानंद देशमुख, युवा भीम शाहीर चरण जाधव, प्रतापसिंग बोदडे आदी हजर होते.

मी पुन्हा येईन...
कार्यक्रमभर कॉमन मॅनसारखे वावरणाऱ्या मंजुळे यांनी वामनदादांवर बोलतानाच सामाजिक मुद्यांना देखील हात घातला. अगदी प्रारंभीच कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत जर तुम्हाला (प्रेक्षकांना) भूक लागली असेल, कंटाळा आला असेल तर शॉर्टमध्ये बोलू का ? अशी  विनम्र विचारणा केली. अर्थात याला पब्लिकमधून नकार आला.

वामनदादांच्या भिमाची लेखणी देखणी या गीताचे कौतुक करून मुळात ही कल्पनाच भारी असल्याचे ते म्हणाले. दादा या भूमीत जन्मले नसले तरी त्यांच्यावर असलेले बुलडाणेकरांचे निस्सीम प्रेम लै भारीच म्हणावं अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. रविकांत तुपकर यांच्या भाषणातील जाहीर निमंत्रणाचा धागा पकडून ते म्हणाले की पुढच्या वेळी बुलडाण्यात नक्कीच येईल. कदाचित शूटिंगसाठी येऊ शकतो, हे आगमन लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.

पुन्हा या, पुन्हा आणू...
यापूर्वी आजचे पाहिले सत्र गाजविले ते तुपकरांनी! आयोजनाप्रमाणेच भाषणात कोणतीच कसर राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत त्यांनी धाराप्रवाही भाषणात वामनदादांच्या गीते, काव्यपंक्ती यांची खुबीने वापर केला. कथनी आणि करणी यात कोणताच फरक न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागनाथअण्णा होय. त्यांच्या हजेरीने संमेलनाला चार चांद लागल्याचे सांगून आजचे संमेलन स्वयंस्फूर्तीने साकारले गेल्याचे तुपकर म्हणाले.

वामनदादांचे बुलडाणा जिल्ह्याशी वेगळे भावबंध जुळले होते. त्यांच्या रचना आजही अजरामर असून त्यांचे साहित्य खऱ्या अर्थाने वैश्विक आहे. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष शासकीय पातळीवर साजरे होणे गरजेचे आहे. मात्र तसे झाले नाही ही खंताची बाब आहे. आजच्या हजेरीमुळे आमचे समाधान झाले नसून, मंजुळे यांनी बुलडाण्यात पुन्हा यावे, असे जाहीर निमंत्रण त्यांनी दिले.

त्यांना यावेच लागेल असा आग्रह त्यांनी धरला. या वेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केले. उद्‌घाटनपर सत्राचे सूत्रसंचालन साहित्यिक रवींद्र साळवे, पत्रकार रणजितसिंह राजपूत यांनी केले. संमेलनाची भूमिका लेखक सुरेश साबळे यांनी मांडली. प्रारंभी शाहीर डी. आर. इंगळे व संचाने स्वागत गीत सादर केले. चरण जाधव यांनी, दोनच राजे इथे जन्मले व शिवरायांच्या छत्रछायेखाली ही स्फूर्ती गीते डफळीच्या तालावर सादर करीत उपस्थितात जोश भरला. कार्यक्रमाला साहित्य रसिकांची तोबा गर्दी उसळली होती.