गोपीनाथरावांमुळे मी घडलो, वंजारी समाज मेळाव्यात केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कऱ्हाड यांचे प्रतिपादन; म्हणाले वंजारी समाज दऱ्याखोऱ्यातला असला तरी कष्टाळू आणि प्रामाणिक समाज!

 आमदार गायकवाडांनी केली बुलडाणा शहरात संत भगवानबाबांचे स्मारक उभारण्याची घोषणा; डॉ.राजेंद्र वाघ यांनी मांडलेले "हे" तीन ठराव मंजूर

 
jbhj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  काही दशकांपूर्वी वंजारी समाजाची ओळख अशिक्षित ,अडाणी समाज अशी  होती. समाजाला लोक ओळखतही नव्हते. मात्र समाजातील  कर्तुत्ववान लोकांनी समाजाला ओळख मिळवून दिली. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी वंजारी समाजासाठी खूप मोठे काम केले. त्यांनी वंजारी समाजातील अनेक नेत्यांना मोठे केले. गोपीनाथरांवामुळेच मी घडलो असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांनी केले. बुलडाणा शहरातील गर्दे सभागृहात आज, ८ नोव्हेंबरला वंजारी समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना ना.डॉ.कऱ्हाड बोलत होते. यावेळी मंचावर नाशिक जिल्ह्यातील आमदार किशोर दराडे, आ.संजय गायकवाड, माजी आमदार तोताराम कायंदे, धुळ्याचे महापौर प्रविण करपे, ॲड. अविनाश आव्हाड, गोपीनाथ वाघ, डॉ. सुकेश झंवर, डॉ.गणेश मांटे ,विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ , मधुकर जायभाये, पंजाबराव इलग, प्रभाकरराव कापकर  उपस्थित होते.

      bondre

                      ( जाहिरात👆🏻 )

पुढे बोलतांना ना. डॉ. कऱ्हाड म्हणाले की, मी गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असलो तरी आज देशाचा अर्थमंत्री म्हणून काम करतोय. आजपर्यंत लाखोंच्या सभांना संबोधित केले, २५ राज्यांत देशाचा अर्थराज्यमंत्री म्हणून अनेक कार्यक्रमांना गेलो मात्र हा घरचा कार्यक्रम पाहून अतिशय आनंद वाटला. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने समाजाला विसरू नये. समाज आहे म्हणून मी आहे याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. वंजारी समाज हा दऱ्याखोऱ्यातला समाज असला तरी कष्टाळू ,प्रामाणिक आणि जिद्दी समाज आहे. समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

      jygh
   
बुलडाणा शहरात भगवान बाबांचे स्मारक उभारणार: आ.गायकवाड
   
 बुलडाणा जिल्ह्यात व मतदारसंघात वंजारी समाजाचे मजबूत संघटन आहे. बुलडाणा शहरात अनेक महापुरुषांचे स्मारक उभे राहत आहे. भगवान बाबांच्या स्मारकासाठी सुद्धा आपण ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा आ.गायकवाड यांनी केली. मतदारसंघात वंजारी समाजाच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात न्याय देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत हे सांगताना त्यांनी जालिंधर बुधवंत यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कसे मिळवून दिले त्याचा किस्सा सांगितला. जेव्हा जेव्हा समाजासाठी काहीतरी करण्याची गरज पडेल तेव्हा मला खारीचा वाटा देण्याची संधी द्या असे आ. गायकवाड म्हणाले. ॲड. अविनाश आव्हाड म्हणाले की समाजातल्या तरुणांची जबाबदारी आता वाढली आहे. समाजातल्या गुणवान तरुणांनी सामाजिक कार्यासाठी झोकून पुढे येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. धुळ्याचे महापौर प्रवीण करपे म्हणाले की, तुम्ही कितीही मोठे झाले तरी आईवडिलांना आणि समाजाला विसरू नका. आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही असे ते उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. माजी आमदार तोताराम कायंदे म्हणाले की, संघटित समाजच प्रगती करत असतो. समाजाच्या कामात राजकारण होता कामा नये. वंजारी समाज संघटनेसाठी नव्या पिढीच्या तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

आमदार किशोर दराडे म्हणाले की, वंजारी समाज हा क्रांती घडवणारा समाज आहे. या समाजामुळेच मला आमदारकीचा मान मिळाला. समाजाचे उपकार कधीही विसरणार नाही असेही ते म्हणाला. आईवडिलांचे नाव रोशन करा असा सल्लाही त्यांनी सत्कारमुर्ती गुणवंत विद्यार्थ्यांना दिला.

समाजाची महाराष्ट्रात एकच संघटना असावी: डॉ.राजेंद्र वाघ
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले. यावेळी बोलतांना डॉ. वाघ यांनी मेळाव्याच्या आयोजनाची भूमिका विषद केली. वंजारी समाजाने एकत्र यावे, प्रगतीचा ध्यास धरावा, एकत्रित काम करून आपसातील हेवेदावे विसरावे, समाजातील गुणवंतांचा गौरव व्हावा यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. वंजारी समाजाच्या आजघडीला अनेक संघटना आहेत, मात्र महाराष्ट्रभर समाजाची एकच संघटना असावी  असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह समाजाच्या सगळ्या मान्यवर नेत्यांना सोबत घेऊन तुम्ही या संघटना वाढीसाठी पुढाकार घ्या असे आवाहन त्यांनी ना.डॉ.भागवत कऱ्हाडांना केले. वंजारी समाजाची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली मात्र राजकीय क्षेत्रात हवी तेवढी झाली नाही. वंजारी समाजाचे महाराष्ट्रात २० आमदार झाले पाहिजे असे ते म्हणाले. भारतात सर्व ओबीसींची जनगणना व्हावी, ओबीसी आणि व्हीजेएनटी साठी नॉन क्रिमेलियर ची अट रद्द करावी तसेच व्हीजेएनटी मध्ये जे २ टक्के आरक्षण मिळते ते वाढवून द्यावे किंवा वंजारी समाजाला त्यातून वगळून स्वतंत्र आरक्षण द्यावे असे तीन ठराव डॉ.वाघ यांनी मांडले. तीनही ठराव मेळाव्यात मंजूर करण्यात आले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांनी केले. कार्यक्रमात ना.डॉ.भागवत कऱ्हाड यांनी राजेंद्र काळे यांचा सत्कार केला.