आणखी किती दिवस सोयाबीन घरात ठेवू? शेतकऱ्यांचा सवाल! भाव पाच हजाराच्या पुढे जाईना

 
market
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या साडेसात लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी जवळपास ४ लाख हेक्टरवर खरिपात सोयाबीन पेरणी झाली होती. नगदी आणि हमखास पैसे मिळणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरली खरी मात्र अतिवृष्टीने उत्पादनात घट होऊनही सोयाबीनचे भाव वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

 खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यंदा उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली मात्र उत्पादनात घट झाली. त्यामुळे भाववाढ होऊन चार पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवून ठेवली. मात्र आता जानेवारी महिना सुरू झाला तरी सोयाबीनचे भाव ५ हजाराच्या वर जायला तयार नाही. यंदा साडेपाच हजार रुपयांपर्यंत सोयाबीन चे दर गेले होते मात्र ते आणखी घसरल्याने ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवली होती ते चिंतेत आहेत. आणखी किती दिवस सोयाबीन घरात साठवून ठेवू असा चिंताजनक सवाल शेतकऱ्यांना सतावत आहे.