लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गर्भपातही केला; दुसरी मिळाल्यावर दिला धोका! बुलडाणा शहरातील घटना

 
535
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार करून तिचा बळजबरी गर्भपात करणाऱ्या तरुणासह गर्भपात करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुण हा २५ वर्षांच्या असून ती चिखली रोडवरील गायकवाड कुशनच्या मागे राहणारा आहे. बुलडाणा शहरातील वृदांवन भागात राहणाऱ्या एका डॉक्टरविरुद्ध सुद्धा याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय तरुणाचे सुंदरखेड मधील शांतीनिकेतन नगरात राहणाऱ्या २२  वर्षीय  तरुणीशी २०१८ पासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशीच लग्न करणार नाही असा शब्द तरुणाने तरुणीला दिला. होणारा नवराच असल्याचे सांगत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या सबंधातून तरुणी गर्भवती राहिल्याने बुलडाणा शहरातील वृंदावन नगरातील एका डॉक्टरच्या मदतीने तिचा बळजबरी गर्भपात केला.

त्यानंतरही दोघांत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान काही महिन्यांपूर्वी तरुणाचे  नात्यातील एका मुलीशी लग्न ठरले. त्यामुळे तरुण त्याच्या आधीच्या प्रेयसीला टाळू लागला. त्याचे लग्न ठरल्याची बातमी कानावर आल्यावर तिला प्रचंड धक्का बसला. तिने त्याने कसा धोका दिला हे तिच्या आईवडिलांना व भावाला सांगितले. त्यामुळे तरुणीचे आईवडील व भाऊ तरुणाच्या घरी त्याला समजावण्यासाठी गेले. तेव्हा तरुणाने  तरुणीच्या वडिलांवर कैचीने हल्ला चढवला व अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. पीडित तरुणीने १८ एप्रिलच्या रात्री दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपास बलडाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत .