गारठा वाढला अन् शेकोट्या पेटल्या! बुलडाण्यात २-३ दिवस तुरळक पावसाची शक्यता;आणखी काय म्हणाले हवामानातज्ञ?

वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरणाची निर्मिती होतेय.याचा शेती पिकांवर दुष्परिणाम जाणवत आहे. दरम्यान, सध्या राज्यासह बुलडाण्यात तापमानाचा पारा घसरुन थंडीचा कडाका वाढल्याने वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला. परिणामी भर दिवसा देखील ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. आजपासून जिल्ह्यात पहाटेच्या किमान तापमानात घट होवून ते २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत असल्याची अनेकांची ओरड आहे.
पिकांवर किडींचे आक्रमण
बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर सुद्धा झाला आहे. विशेषता तू हरभऱ्यांवर किडींचा प्रादुर्भाव पसरला आहे. मिरची वांगे ह्या फळभाज्या धोक्यात आहेत. शेतकऱ्यांनी कापणी व तोडणी केलेल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम नाही
तापमानात आणखी घसरण होऊन थंडी पुन्हा जाणवण्याची पुढील दोन-तीन दिवस शक्यता आहे. केवळ किमानच नाही, तर बुलडाणासह राज्यात कमाल तापमानातही घट होऊ शकते. बंगालच्या उपसागरातील तमिळनाडूच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यातील थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नाही, असेही हवामान तज्ञांनी स्पष्ट केले आहे.