'"हाई झुमका वाली पोरं,नदी थडी तू चालनी !'पर्यटकांची पावले वळलीत पलढग तळ्याकाठी! थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन नौकाविहाराने; स्वागतासाठी ज्ञानगंगा अभयारण्य सजले;बुकिंग साठी करा "या" नंबरवर संपर्क

 
u6ky
बुलडाणा (प्रशांत खंडारे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बोटेत बसून धरणाची सैर करण्यासारखा दुसरा आनंद नाही. एकीकडे पक्षांचे नैसर्गिक गुंजन तर दुसरीकडे पर्यटकांच्या मागणीवरून अत्याधुनिक इंजिन बोटीतील 'हाई झुमका वाली पोरं, नदी थडी तू चालनी ' या अहिराणी गाण्यातील धडाकेबाज संगीतात नौकाविहाराचा व निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटलाय तो जिल्ह्यातील पर्यटकांनी! निमित्त होते ते थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचे व नववर्षाच्या स्वागताचे! आज ३० डिसेंबरलाच अनेक पर्यटकांनी ज्ञानगंगा निसर्गसौंदर्य अनुभवले तर पलढग धरणातील जलविहार मनमुराद आनंदाची पर्वणी ठरली.

 बुलडाणा प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.येथील ज्ञानगंगा अभयारण्य  देश विदेशातील पर्यटकांच्या पसंतीसाठी नेहमीच अग्रस्थानी असते.सरत्या वर्षाला निरोपासह नव वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी निसर्ग प्रेमींनी 'जंगल सफारीचे' ३० डिसेंबरला नियोजन केले. २२ हजार हेक्टर क्षेत्रात विखुरलेल्या या अभयारण्यात बीबट, चितळ, सांभार, हरीण,निलगाय, सायाळ, मोर आदीं जैवविविधता  अनेकांना भुरळ घालत असल्याने बुकिंग करण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ सुरू आहे. दरम्यान दानमाळ, सागरमाळ, लाखेचा झिरा, ज्ञानगंगा नदीचे उगमस्थान त्याचबरोबर पलढग धरणामध्ये मानसोक्त नौकाविहार आणि निसर्गाची अनुभूती पर्यटकांनी घेतली.

 पत्रकारांनी केला अभ्यास दौरा

ज्ञानगंगातील विविध स्थळांची माहिती घेत २२ शहरी व ग्रामीण पत्रकारांनी हा अभ्यास दौरा केलाय.जिल्ह्यात कुठेही बोट नाही.पर्यटन विकास योजनेअंतर्गत १० कोटी रुपयांच्या निधी मंजूर होऊन पलढग धरणात ५२ लक्ष निधीतून २ अत्याधुनिक बोटी उपलब्ध झाल्या.२६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताकदिनी या इंजिन बोटीचे उद्घाटन खासदार जाधव,आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले होते. एका बोटीत ११ जणांना प्रवेश दिला जातो. प्रति व्यक्ती १०० रुपये असे शुल्क आहे. अर्धा तास पर्यटकांना सैर घडवून आणतात.वोटिंग करताना पर्यटकांची विशेष दक्षता घेतली जाते. पत्रकारांनी देखील नौकाविहार केला. वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड (बुलडाणा) दीपेश लोखंडे (खामगाव) यांनी अभ्यास दौऱ्याला परवानगी दिली.यावेळी वनपाल रघुनाथ नेवरे, गाईड श्रीधर अंभोरे, बोटिंग ड्रायव्हर नितीन सपकाळ, रामेश्वर तायडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जंगल सफारीची बुकिंग करायची असल्यास, ९५४५७७२०९३,९४०५७४२३९८ या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.