महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्याला उद्देशून पालकमंत्र्यांचे भाषण! म्हणाले,जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध; सरकारच्या योजनांचा वाचला पाढा

 
kug
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कोरोनाच्या तीन लाटा आपण अनुभवल्या आहेत. राज्य शासनाने प्रशासनासोबत उपाययोजना हाती घेतल्याने तिसरी लाट नियंत्रणात आली. मात्र आता पुन्हा चौथ्या लाटेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून आणि लसीकरण करून ही लाट आपल्याला थोपवायची आहे. त्यामुळे कोरोनावर मात करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. आज, १ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनामित्त शासकीय ध्वजारोहण सोहळा बुलडाणा येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडला. यावेळी जिल्ह्याला उद्देशून केलेल्या भाषणात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांनी राज्य शासनाच्या वतीने जिल्हावासियांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

 सरकारने आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत या वयोगटातील ३३ हजार ७९१ जणांना   लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले अशा  १५ बालकांना ५ लाख  रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र आणि अनाथ प्रमाणपत्र देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांसाठी  मिशन वात्सल्य योजना सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील ३३७ विधवा महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी केंद्रातून गेल्या वर्षभरात ९ लाख ३६ हजार थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात  ३४० पाणंद रस्ते तयार करण्यात आले आहेत. १ लाख ७४ हजार ७२८ शेतकऱ्यांचे ११५३ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार ९७९ घरकुल पूर्ण करण्यात आले आहेत.

याशिवाय रमाई आवास योजनेतून २०२१ - २०२२ मध्ये ८ हजार ४६२ घरकुलांना मंजुरी देण्यात आल्याचेही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी सांगितले. भाषणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची, विविध पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस विभागासाठी देण्यात आलेल्या वाहनांना त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामुर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांची उपस्थिती होती.