आमच्या घामाचे पैसे परत द्या हो..! गुंतवणुकदारांचा टाहो! गरिमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० कोटींनी फसवले! राष्ट्रवादीचे जिल्हा सहसचिव ऋषिकेश म्हस्केंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट;

 म्हणाले तात्काळ पैसे परत करा,अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ

 
yufyfuyfu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गरिमा रिअल इस्टेट अँड अलाइंड लि. कंपनी आणि कंपनीशी संबंधित इतर संलग्न कंपन्यांमध्ये गुंतवलेली कष्टाची जमापुंजी परत करा असा आर्त टाहो २० जानेवारी रोजी जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी फोडला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत  मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले असून न्यायाची मागणी रेटण्यात आली.

 "गरिमा रियल इस्टेट अँड अलाईड लिमिटेड व गरिमा होम्स अँड  फामा हाऊसेस लिमिटेड आणि साथी मल्टीस्टेट सोसायटी ही प्रतिष्ठाने आर्थिक व्यवहार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यात सुरु केली. संस्थेचे काम संपूर्ण राज्यभर वाढविण्यासाठी त्यांनी रितसर वृत्तपत्रांमध्ये प्रतिनिधी नेमण्यासंदर्भात जाहिरात देऊन प्रतिनिधींची नेमणूक सुध्दा केली. अनेक जिल्ह्यांमध्ये कंपनीने कार्यालय भाडेतत्त्वावर घेतली गेली तसेच कंपनीच्या नावे प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा जवळपास दीड हजारांवर प्रतिनिधी नेमण्यात आले होते. कंपनीने नेमलेल्या प्रतिनिधीमार्फत आरडी बचत खाते, मुदत ठेव खाते, मासिक, वार्षिक, सहामाही अशा विविध योजना चालविण्यात आल्या. दाम दुप्पट, तिप्पट परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले.  सुरुवातीला पैसे परत मिळाले सुद्धा. परंतु सन २०१४-१५ पासून कंपनीकडून गुंतवणूकदारांना परतावा येणे बंद झाले. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास ५० कोटी रुपये कंपनीत गुंतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

दरम्यान २० जानेवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषीकेश म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गरिमा आणि संलग्न कंपन्यांवरील राज्यभरातील दाखल गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र तात्काळ दाखल करावे, तसेच गुणवणूकदारांचे पैसे परत करावे, अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अनिल माने, दिनेश जाधव, सुधाकर भुतेकर, श्रीराम नवले, श्रीकिसन सोलार, प्रदीप सावळे, दिलीप मोरे, प्रवीण अंभोरे, राजीव जाधव, राजू पवार, प्रल्हाद मोरे, उषा गवई, दीपक जाधव, संगीता बनसोडे, संदीप सोलार आदींची उपस्थिती होती.