मेहकर तालुक्यात पुन्हा गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन घरे जळून खाक; ५० हजाराची रोकड जळाली!

 
758624
मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत तीन घरे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. काल, १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मेहकर शहरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सिलेंडर स्फोटात सुद्धा मोठे नुकसान झाले होते.

 शेळगाव देशमुख येथील  भीमराव आमटे यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की सिलेंडरचे तुकडे तुकडे झाले. यावेळी लागलेल्या आगीमुळे शेख कालू शेख हबीब व रघुनाथ खंडारे यांचे घरेही जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या आगीत आमटे यांच्या घरातील ५० हजारांची रोकड, १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, बकऱ्यांची १६ पिल्ले, २ मोटारसायकली व इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या.

गावकऱ्यांनी टँकर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मेहकर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच मेहकरचे तहसीलदार डॉ संजय गरकल, डोणगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार निलेश अपसुंदे व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पळसकर, शैलेश सावजी, वसंतराव देशमुख, मंडळ अधिकारी, तलाठी , ग्रामसेवक  यांनी पंचनामा केला.