GOOD NEWS २५ कोटींचे पशुधन वाचविण्यात यश!४६,४०७ जनावरे लम्पीमुक्त;जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणेचे यश

 
lampi
बुलडाणा (प्रशांत खंडारे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गुरांवर आलेला लम्पी चर्मरोग हाताबहेर जात होता.मात्र आताशा लम्पी नियंत्रणात आल्याचे दिसतेय. गतवर्षातील सप्टेंबरपासून लम्पीने गोठ्यांना दिलेली मरणकळा नववर्षाच्या सुरुवातीला काहीशी शमल्याची वार्ता कानी पडत आहे.जिल्ह्यात गुरांच्या दर दिवसाच्या मृत्यूदरात घसरण झाली असून, ४६ हजार ४०७ गुरे लम्पीमुक्त झाली. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने गत ४ महिन्यात युद्ध स्तरावर प्रयत्न केल्याने आजच्या बाजारभावा प्रमाणे शेतकऱ्यांचे जवळपास २५ कोटी रुपयांचे पशुधन वाचविण्यात यंत्रणेला यश आले आहे. 

लम्पी जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये शिरला आणि जुलैमध्ये बेकाबू झाल्याचे दिसले. इतर वेळी समाधानाने रवंथ करणाऱ्या जनावरांच्या डोळ्याकडे पाहिले की, जणू ते वाचविण्याची याचना करीत असल्याचा प्रत्यय प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी दिसून येत होता.अंगावर उठलेल्या गाठी व तोंडातून गळणारे रक्त अक्षरशा अंगावर शहारे आणणारे होते. मात्र या अबोल दुभत्या जनावरांची वेदना यंत्रणेला विलंबानेच कळाली, असे म्हणायला हरकत नाही. कारण जिल्ह्यात एकूण ४ हजार ७३९ गुरे दगावली. पशुपालकांना आर्थिक फटका बसला. या चर्मरोगाचा दूध उत्पादनावर परिणाम झाला.३० ते ४० टक्के दूध उत्पादन घटले. आता मात्र ही बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लम्पीने ५५,४८७ गुरे संक्रमित झाली. ३,४४,८६५ गुरांचे लसीकरण करण्यात आले. सद्यस्थितीत ४८५ संक्रमित गुरांवर उपचार सुरू आहेत.असे असले तरी लम्पीने बळी पडलेल्या गुरांचा मोबदला अर्थात शासकीय मदत देण्याची कुर्मगती पशुपालकांसाठी त्रासदायक ठरत आहे.