माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, शहीद भूमिपुत्रांचे कार्य सदैव स्मरणात राहील! वीर जवान कैलास पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त केले अभिवादन!

 
shingne
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भारतीय सैन्यदलाचे वीर जवान शहीद कैलास पवार हे उने पन्नास डिग्री तापमानात सियाचीन येथे कर्तव्यावर होते. तिथे खाली उतरत असताना ते पाय घसरून खाली कोसळले. या दुर्दैवी घटनेत त्यांना वीरमरण आले. देशासाठी सर्वस्व समर्पित करणाऱ्या  कैलास पवार यांचेसह शहीद जवानांचे कार्य सदैव स्मरणात राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. वीर जवान कैलास पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ३० जुलै रोजी चिखली येथे अभिवादन प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या मातीला शौर्याचा, धैर्याचा ,परिक्रमाचा आणि बलिदानाचा गौरवशाली इतिहास आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहत आपल्या इतिहासाचे स्मरण ठेवून सैन्य दलाच्या विविध क्षेत्रात भरती व्हावे. शहिद जवान कैलास पवार यांचा आदर्श प्रत्यके तरुणाने जोपासला पाहिजे. कैलास पवार यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी प्राणार्पण केले त्यांच्या त्यागाला सलाम असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले.

यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी वीर जवान कैलास पवार यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. वीरपुत्राच्या कुटुंबियांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचा शब्द यावेळी डॉ. शिंगणे यांनी दिला.