'आम्हासाठी तर भिलठाणाच पंढरपूर! जुन्या कसब्यातील राऊळातच भेटतो पांडुरंग'!!

 
vitthala
 बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रापंचिक अडचणी, व्याधी, व्यस्त जीवनशैली आदी कारणामुळे आषाढीला पंढरपूरच काय प्रति पंढरपूर असलेल्या संतनगरी शेगावला देखील जाणे न जमणाऱ्या आटपाट बुलडाणा नगरीतील हजारो आबालवृद्ध भाविकांसाठी,  जुन्यागावातील कमीअधिक ३०० वर्षे पुरातन विठुरायाचे मंदीरच पंढरपूर आहे. या जागृत मंदिरात साक्षात पांडुरंगाचे दर्शन होते, अशी त्यांची गाढ श्रद्धा आहे. खास पंढरपूरवरून  आणलेल्या आकर्षक, सुबक मूर्त्यांचे दर्शन घेतले की आपण चंद्रभागेच्या तिरीच आहोत असा भास होतो...

यंदाची आषाढी सुद्धा या पवित्र भावना व श्रद्धेच्या परंपरेला अपवाद ठरली नाही. आज १० जुलैला पहाटे पासूनच जुन्यागावातील हनुमान मंदिर संस्थानाच्या मंदिरात भाविकांची रीघ लागली. रिमझिम व मधेच जोरदार बरसणाऱ्या पावसाची तमा न बाळगता आज दिवसभर मंदिरातील विठुरुखमाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी जमल्याचे दिसून आले. २ वर्षातील आषाढी कोरोना च्या  सावटाखाली गेल्याने यंदाचा उत्साह नजरेत भरण्यासारखा होता. 

३०० वर्षांचा इतिहास

 हे मंदिर कमीअधिक ३०० वर्षे पुरातन असल्याचे मंदिरात निस्वार्थ सेवा करणाऱ्या चिंचोळकर घराण्याच्या चौथ्या पिढीतील रवींद्र चिंचोळकर यांनी सांगितले. सुरुवातीला मारोतीरायाची मूर्ती होती, नंतर शिवलिंग आणि नंतर विठुमाई व अन्य देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून अलीकडे श्रीराम,सीता, लक्ष्मण यांच्या सुबक मूर्त्यांची या अध्यात्मिक वैभवात भर पडली आहे.

विठ्ठल रुखमाईच्या पुरातन मूर्तीची झीज झाल्याने ४० वर्षा पूर्वी पंढरपूर येथून सध्याची मूर्ती आणण्यात आली.भास्कर चिंचोळकर, रामभाऊ गायकवाड, विठ्ठल देशमुख, यांनी ही मूर्ती आणल्याची माहिती रवींद्र महाराजांनी दिली.  आषाढीला  जाणाऱ्या मुक्ताबाईंच्या पालखीचा मुक्काम या ठिकाणी राहण्याच्या परंपरेला सव्वा दोनशे वर्षे झाली आहे.त्यामुळे हे मंदिर ३०० वर्षे पुरातन आहे. सुखदेव कर्हाळे यांच्या अध्यक्षतेखालील पंच मंडळाचे परिश्रम आणि प्रशस्त सभागृह बांधून देणारे आ. संजय गायकवाड यांच्यामुळे संस्थान प्रगती करीत असल्याचे त्यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले.