आधी दाखवला चाकूचा धाक, नंतर गुंगीचे औषध देऊन घटस्फोटीत महिलेवर बलात्कार!

 
4525
सिंदखेडराजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):- चाकूचा धाक दाखवून व गुंगीचे औषध पाजून २० वर्षीय घटस्फोटीत महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग घेत ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार करण्यात आला. या प्रकारातून पीडित महिला ती गर्भवती राहिली.  गरोदर अवस्थेतसुद्धा तो तिच्यावर अत्याचार करीत राहिला. अखेर त्रास असह्य झाल्याने तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील शेख अन्सार शेख गफ्फार (३७) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 पीडित घटस्फोटीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे वडील शेख  अन्सार याच्याकडे कामाला होते.  घटस्फोटानंतर ती तिच्या वडिलांकडे मलकापूर पांग्रा येथेच राहते. त्यामुळे आरोपी शेख अन्सार तिच्या वडिलांकडे नेहमी यायचा. त्याने तिचा मोबाईल नंबर सुद्धा मिळवला होता. १५ जुलै २०२१ ला रात्री १० वाजता शेख अन्सार ने तिला फोन केला. तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे असे सांगून तिला मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावले.

त्यानंतर तिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बंद पडलेल्या क्वार्टरमध्ये बळजबरीने ओढत नेले. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे तो तिला म्हणाला.  महिलेने आरडाओरड केल्याने त्याने तिला चाकूचा धाक दाखवून गप्प केले. त्यानंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी मी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले आहे, या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करील, तुझ्या आईवडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली.

त्यानंतर सातत्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो वेळोवेळी तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. या प्रकारामुळे पीडिता गर्भवती राहिली. शेख अन्सारचा त्रास असह्य झाल्याने तिने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शेख अन्सार विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार सचिन कानडे करीत आहेत.