अखेर संप मागे!तब्बल १८ तास वीज ग्राहकांची डोकेदुखी! अखंडित वीज पुरवठ्यासाठी दिलेला टोल फ्री नंबरही होता बंद!

 
dp

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खाजगीकरणाला विरोध म्हणून काल, रात्री पासून  तब्बल २ हजार कर्मचाऱ्यांनी ३ दिवसीय लाक्षणिक संप पुकारल्याने ८० % वीजपुरवठा बंद केला. अखेर अठरा तासानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. दरम्यान बहुतांश ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने डोक्याला बाम लावण्याची वेळ आली होती. महावितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा साठी टोल फ्री नंबर दिला होता. मात्र हा नंबरही लागला नाही. अडचणीच्या काळात ग्राहक फोन लावून लावून कंटाळले होते.

 ३ जानेवारीला मध्यरात्रीपासून  सुरू झालेल्या ७२ तासाच्या संप काळात सुरळीत वीज पुरवठ्याची  खबरदारी घेणार असल्याचे सूतोवाच वरिष्ठ स्तरावरून करण्यात आले होते.या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले होते. तरी पण वीज कर्मचाऱ्यांच्या संपात महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील  एकूण ३२ संघटनांचे कर्मचारी,अभियंते व अधिकारी सहभागी झाले होते. बुलडाण्यात तब्बल २ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले.

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात येण्याचे आश्वासित करण्यात आले होते. परंतु बुलडाण्यात १५०० महावितरण चे कर्मचारी आणि ५०० कंत्राटी कर्मचारी असे एकूण २००० कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला. हा तीन दिवसीय संप पुकारल्याने व ८० टक्के वीजपुरवठा बंद झाल्याने ग्राहक हैराण झाले. तत्पूर्वी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेला टोल फ्री नंबर सारखा खणखणत  होता. मात्र १८००२१२३४५/१८००२३३३४३५/१९१२/१९१२० हा नंबर मात्र कोणी घ्यायला तयार नव्हते. अखेर तब्बल १८ तासानंतर संप मागे घेण्यात आला आहे.