फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल! बुलडाणा शहरातील घटना

 
446
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  फेसबुकवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी बुलडाणा शहरातील इकबाल नगरमधील एका तरुणाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा शहर  पोलीस ठाण्यातील पोलीस  शिपाई उमेश घुबे यांनी याप्रकरणाची  तक्रार दिली आहे. २२ एप्रिल रोजी उमेश घुबे फेसबुक अकाउंट पाहत असताना पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा जिल्हा समन्वयक इलीयास समीर खान (३०, रा. इकबालनगर, बुलडाणा) याने फेसबुक अकाउंटवर जातीय तेढ निर्माण होईल, अशा दोन समाजाच्या भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाकल्याचे त्यांना आढळून आले असे तक्रारीत म्हटले आहे.

इलीयास समीर खान असे उद्योग नेहमीच करत असतो. यापूर्वी ५ डिसेंबर २०२१ ला त्याने इकबाल चौक परिसरात आक्षेपार्ह बॅनर लावले होते. तेव्हाही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता असे पोलीस सूत्रांनी सांगितले.  याप्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलीस निरीक्षक नीलेश लोधी करीत आहेत.